रेवदंडा शाळेच्या वर्गात अंधश्रद्धेचा थरार; अघोरी कृत्याने खळबळ
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, रेवदंडा २४ मार्च २०२६
रेवदंडा येथील मारुती आळीतील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेच्या वर्गात अघोरी कृत्य करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
“ज्ञानाच्या मंदिरात अंधश्रद्धेचा अंधार शिरला…पण आता सत्याचा दिवा पेटवून दोषींना उघड करणं, हीच समाजाची जबाबदारी आहे!”
शाळेसारख्या पवित्र स्थळी, जिथे ज्ञानाचे धडे गिरवले जातात, त्याच वर्गात अशा प्रकारचे अंधश्रद्धेचे कृत्य केल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. अज्ञात व्यक्तींनी शाळेच्या पाठीमागील दरवाजा जिरत उघडून वर्गात प्रवेश करत भाकरीचे पीठ, लिंबू, लाल दोरे, तुटलेल्या बांगड्या तसेच करणीसाठी वापरले जाणारे साहित्य पसरवले. दरवाजाजवळ आणि बाथरूम परिसरात रक्तासारखे दिसणारे डागही आढळले. या घटनेमागे कोणावर तरी काही आकरीत (करणी) करण्याचा उद्देश असल्याचा स्थानिकांमध्ये जोरदार संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, अशा कृत्यासाठी शाळेचा वर्ग निवडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि रोष वाढला आहे. घटनेची माहिती मिळताच सरपंच प्रफुल्ल मोरे यांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य दुशांत झावरे , प्रमोद नवखरकर तसेच इतर ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घटना कळताच रेवदंडा पोलीस ठाण्याचे सिद्धेश शिंदे, सुधीर पाटील व इतर स्टाफ घटनास्थळी पोहचे असून पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही घटना केवळ शाळेपुरती मर्यादित नाही…तर ती आपल्या समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी आहे. ज्या वर्गात उद्याचे अधिकारी, सैनिक, आणि जबाबदार नागरिक घडतात, त्याच वर्गात रात्रीच्या अंधारात अंधश्रद्धेचे खेळ मांडले जात असतील, तर ही केवळ चोरी किंवा घुसखोरी नाही तर संस्कारांवरच केलेला हल्ला आहे! आज प्रश्न फक्त इतकाच नाही की हे कृत्य कोणी केलं…तर प्रश्न असा आहे की, अशा विकृत विचारांना समाजात अजूनही जागा कशी मिळते? जर वेळेत या घटनेचा छडा लावला गेला नाही, तर उद्या अशाच पवित्र ठिकाणी पुन्हा अंधार पसरायला वेळ लागणार नाही.


![]()

