रेवदंडा व परिसरात वानरांचा धुडगूस महिन्यांपासून सुरू असलेला उपद्रव, नागरिकांचे मोठे नुकसान घरांमध्ये घुसखोरी, काचा-आरसे फोडणे, बागांची नासधूस उपाययोजनांची तातडीची गरज

  • छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
  • ✍️ सचिन मयेकर
  • 📅 मंगळवार , २० जानेवारी २६
रेवदंडा व परिसरात वानरांच्या टोळक्याने गेल्या काही महिन्यांपासून सलग धुडगूस घालत नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान केल्याच्या घटना समोर येत आहेत. घरांमध्ये थेट घुसखोरी करून काचा-आरसे फोडणे, कपडे-घरगुती साहित्याचे नुकसान करणे तसेच बागांमधील फळझाडांची नासधूस करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत.
पागार मोहल्ला येथील आसिफ लांबाते यांच्या घरात वानरांनी बाल्कनीतून आत प्रवेश करून ठेवलेला ड्रेससिंग टेबल फोडून टाकल्याची अलीकडील घटना आहे. तसेच सलीम तांडेल यांच्या घराशेजारी लावलेला दाढी करण्याचा काचेचा आरसा वानरांनी आपटून फोडला. याच उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर, राजेंद्रकुमार वाडकर यांच्या घराच्या खालील स्लायडिंग काचेच्या दरवाजावर वानरांनी उड्या मारून काचा फोडण्याचा प्रयत्न काही महिन्यांपूर्वी केल्याची घटना स्थानिक नागरिकांनी आठवण करून दिली आहे. म्हणजेच हा प्रश्न तात्पुरता नसून दीर्घकाळापासून सुरू असल्याचे स्पष्ट होते.
याच टोळक्याने परिसरातील बागांमध्ये घुसून केळीचे घड तोडणे, चिकूच्या झाडांची नासधूस करणे, तसेच काही घरांच्या छपरांचे नुकसान केल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून पुढे येत आहेत. वानरांचा उपद्रव वाढत चालल्याने हा प्रश्न आता केवळ वैयक्तिक न राहता संपूर्ण परिसराचा गंभीर विषय ठरत आहे.
🔍 वानरांच्या उपद्रवावर शक्य व व्यवहार्य उपाययोजना
तातडीच्या उपाययोजना (घरगुती पातळीवर):
बाल्कनी, खिडक्या व स्लायडिंग काचांवर मजबूत जाळी किंवा ग्रिल बसवणे, घराबाहेर अन्नपदार्थ व फळे न ठेवणे, आरसे-काचा व चमकदार वस्तू बाहेर लावणे टाळणे, नैसर्गिक वानर प्रतिबंधक स्प्रे किंवा वास देणारे पदार्थ वापरणे, तसेच छपरांवर सेफ्टी स्ट्रिप्स बसवणे हे उपाय तातडीने करता येऊ शकतात.
सामूहिक व प्रशासकीय उपाययोजना:
ग्रामपंचायतमार्फत वनविभागाकडे अधिकृत तक्रारी नोंदवून वानर पकड मोहीम राबवणे, वस्तीतील कचरा व उघडी अन्नस्थळे बंद करणे, वस्तीपासून दूर नैसर्गिक अधिवासात अन्न-पाण्याची व्यवस्था करणे, उपद्रवग्रस्त भागात संरक्षणात्मक जाळ्या व कुंपण उभारणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे या उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
नागरिक, ग्रामपंचायत आणि वनविभाग यांनी समन्वय साधून तातडीने पावले उचलल्यास रेवदंडा व परिसरातील वानरांचा उपद्रव आटोक्यात आणणे शक्य असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *