रेवदंडा–मुरुड मार्गावर ‘मृत्यूचा सापळा’! निष्काळजी रस्ते कामामुळे वनरक्षकाचा मृत्यू; कुणाच्या जीवाची काही किंमत शासनाला आहे की नाही? आता या निष्काळजीपणासाठी गुन्हा कोणावर होणार?
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ प्रतिनिधी रविवार ०८ मार्च २०२६
रेवस–रेड्डी मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातील रेवदंडा पुलावरून उजव्या बाजूने मुरुडकडे जाताना चेकपोस्टपासून पुढे रस्ता खोदण्यात आला असून सध्या तेथे रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने संपूर्ण परिसर धोकादायक बनल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे. काही ठिकाणी रस्ता दोन ते तीन फूट खोल करून एका बाजूने पूर्ण फोडण्यात आला असून वाहनचालकांचा अंदाज चुकून गाड्या थेट खोदलेल्या नाल्यात जाण्याचे प्रकार घडत आहेत.टप्या टप्याने काम करण्याचे सोडून एकच वेळी सगळीकडे रस्ते फोडून ठेवलेले असल्यामुळे वाहन चालवीतना तारेवरची कसरत होत आहे.

विशेष म्हणजे अशा धोकादायक ठिकाणी बॅरिकेट्स, सूचना फलक किंवा कोणतेही इशारे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे खोदून ठेवलेल्या खोल खड्ड्यात दुचाकी कोसळल्याने अलिबाग वनविभागातील तिनविरा येथे कार्यरत वनरक्षक सुरज सारंगे यांचा शुक्रवारी (दि.६) रात्री दुर्दैवी मृत्यू झाला.अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. रस्त्याचे काम सुरू असतानाही सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न केल्याने वाहनचालकांचे जीव धोक्यात घालण्यात येत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. ज्या फिती लावल्या आहेत त्यातच गुंतून अपघात होण्याचे जास्त चान्सेस आहेत. रेडिएम बारिकेट्स सुद्धा नसल्याने हमखास अपघाताला कारण बनत आहें.
या ठिकाणी संपूर्ण रस्ताच उखडून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याच्या एका बाजूनेच मार्ग काढावा लागत आहे. अशा वेळी एका बाजूने वाहने जात असताना समोरून दुसऱ्या बाजूने गाडी आली तर कोण पुढे जाईल आणि कोण गाडी मागे घेईल यावरून अनेकदा वाद निर्माण होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
विशेष म्हणजे अशा परिस्थितीत वाहतूक नियंत्रणासाठी ठिकाणी कोणताही कर्मचारी किंवा कामगार उपस्थित नसतो. त्यामुळे वाहनचालकांना स्वतःच मार्ग काढावा लागत असून त्यामुळे गोंधळ आणि अपघाताचा धोका अधिक वाढत आहे.
स्थानिकांच्या मते, ज्या ठिकाणी संपूर्ण रस्ता उखडून काम सुरू आहे, त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी माणूस उभा करणे आणि योग्य सूचना फलक लावणे आवश्यक आहे. मात्र अशी कोणतीही व्यवस्था नसल्याने हा मार्ग अक्षरशः धोकादायक ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या निष्काळजीपणामुळे वारंवार अपघात होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. या मार्गावर एका बाजूला खडी अंथरण्यात आली असून दुसऱ्या बाजूला मातीचा भाग आहे. त्यामुळे रस्त्याची पातळी समतोल राहिलेली नाही. खडी टाकलेल्या भागामुळे रस्त्याचा तो भाग उंच झाला असून बाजूचा मातीचा भाग खाली राहिला आहे. परिणामी वाहनचालकांना रस्त्याचा अचूक अंदाज येत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा वेगात येताना गाडी घसरून किंवा तोल जाऊन अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.स्थानिकांच्या मते, या ठिकाणी कोणतीही निशाणी, बॅरिकेट्स किंवा सूचना फलक नसल्याने हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे.
याच रस्त्यावर रस्त्याच्या कामातील हलगर्जीपणामुळे वनविभागातील एका वनरक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाही परिस्थितीत कोणताही बदल झालेला दिसत नाही. स्थानिकांनी रस्त्याच्या कामाबाबत आवाज उठवला किंवा हस्तक्षेप केला तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होतात, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत.मात्र आता या निष्काळजी कामामुळे एका सरकारी कर्मचाऱ्याचाच जीव गेला असताना, या मृत्यूला जबाबदार कोण? माणसाच्या जीवाची काही किंमत आहे की नाही? की ठेकेदारांनी ग्रामस्थांचे जीवच विकत घेतले आहेत? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि युवकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या रस्त्याच्या कामाबाबत जागेचा प्रश्न उपस्थित झाला किंवा काही वाद निर्माण झाला तर थेट ग्रामस्थांवरच गुन्हे दाखल होतात, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. हे काम केंद्र शासनाच्या योजनेतून सुरू असतानाही स्थानिकांनी प्रश्न उपस्थित केला तर त्यांच्यावर कारवाई केली जाते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मात्र आता याच रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणामुळे एका सरकारी कर्मचाऱ्याचाच जीव गेला आहे. मग या मृत्यूला जबाबदार कोण? माणसाच्या जीवाची काही किंमत आहे की नाही? ग्रामस्थांनी आवाज उठवला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, पण अशा हलगर्जी कामामुळे एखाद्याचा जीव गेला तर त्या जबाबदारांवर गुन्हा कोण दाखल करणार आणि कधी करणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
![]()





