रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवविवाहित तरुणीची आत्महत्या

रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोर्लई गावात एका नवविवाहित तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना २९ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे.
सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल ३० ऑगस्ट २०२५
मयत तरुणीचे नाव भाग्यश्री समीर बलकवडे (वय ३२) असून, ती आपल्या नवविवाहित आयुष्यातील अवघ्या वर्षभरातले आनंदाचे क्षण साजरे करत होती. गणेशोत्सवासाठी कुटुंब मूळगाव कोर्लई येथे आले होते. दीड दिवसाचा गणपती उत्सव आनंदात साजरा झाला, परंतु दुसऱ्याच दिवशी अचानक वादातून ही घटना घडली.
मयत तरुणीची आई मंजुळा दत्ता पाटील (वय ५५, राबोडी-ठाणे) यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, भाग्यश्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती समीर विलास बलकवडे, सासरे विलास महादेव बलकवडे, सासू मीना विलास बलकवडे, आणि नणंद वैष्णवी विलास बलकवडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल दि. २९ ऑगस्ट रोजी दुपारी ११ नंतर भाग्यश्री आपल्या ३.५ महिन्यांच्या बालकाला आंघोळ घालत होती. यावेळी पतीकडून चुकून बालकाच्या डोळ्यात पाणी गेले. यावरून झालेल्या तक्रारीतून वाद उभा राहिला. त्यावेळी सासूने समजूत घालून परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आणिं त्यावेळी तिथून सर्वजण भाग्यश्री सोडून सर्वजण बाहेर गेले होते.परंतु काही वेळाने घरात दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर, आतून दरवाजा बंद असल्याचे समोर आले. दरवाजा तोडून पाहिल्यावर भाग्यश्रीने गळफास घेतल्याचे उघड झाले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता १०८, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कीरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बाचकर करत आहेत.
ही घटना गावात हळहळ पसरवणारी ठरली असून, नवविवाहित तरुणीच्या आत्महत्येने संपूर्ण कुटुंब व गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.