रेवदंडा पोलीस ऍक्शन मोडमध्ये • गुन्हेगारी साखळीच्या मुळावर घाव घालण्याची रणनीती

छावा दि. २३ जुलै रेवदंडा (विशेष प्रतिनिधी)
खाकी कारवाईचे स्वरूप बदलणार : आचल दलाल यांची ग्वाही
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत रेवदंडा पोलीस ठाणे गेल्या अनेक दिवसांपासून ऍक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. पोलिस प्रशासनाने ‘गुन्हे घडण्याआधीच त्यांना रोखण्याची’ एक नवी रणनीती अंमलात आणली असून, आता खाकी कारवाईचे स्वरूप बदलणार अशी ग्वाही आपल्या कृतीतून आचल दलाल यांनी दिली आहे.
रेवदंडा पोलिसांनी गेल्या काही दिवसांत संपूर्ण परिसरात बेकायदेशीर धंद्यांविरोधात धडक मोहीम उघडली आहे. गुटखा, मावा, विमल यांसारख्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी थेट पान टपऱ्यांपासून थेट गोडाऊनपर्यंत छापे टाकत कारवाई सुरू केली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या स्पष्ट आदेशानंतर ही मोहीम व्यापक स्वरूपात सुरू झाली.
“खाकीची कारवाई केवळ तात्पुरत्या छाप्यांपुरती मर्यादित न राहता, संपूर्ण गुन्हेगारी साखळी उद्ध्वस्त करण्याची आमची रणनीती आहे,” अशी ठाम ग्वाही दलाल त्यांनी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रेवदंडा पोलीस ठाण्याने ही मोहीम प्रत्यक्षात आणली असून, सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पोलीस ठाणे सक्रिय झाले आहे.
किरवले यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, “रेवदंडा परिसरात गुन्हेगारीसाठी कुठेही जागा उरलेली नाही. आमचा उद्देश गुन्हेगारीला मुळासकट उखडून टाकण्याचा आहे.”
या भूमिकेला कृतीची जोड देत किरवले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मशीलकर, हेड कॉन्स्टेबल मनीष ठाकूर, पारवे, राठोड तथा विविध पथक अधिकारी यांनी पानटपऱ्या, गोडाऊन, किराणा दुकाने आणि विविध ठिकाणी तपासाचे जाळं पसरवले आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, सद्य:स्थितीत अद्याप कोणताही आरोपी पोलिसांच्या तावडीत आलेला नसला, तरी ही कारवाई तपासाचा सुरुवातीचा टप्पा मानली जात आहे. पोलिसांच्या हालचालीमुळे साखळीतील इतर दुवेही दबा धरून बसल्याचे संकेत आहेत.
या मोहिमेत पोलीस विभागाच्या गुप्तवार्ता शाखेचा मोलाचा सहभाग असून, शहरात गोपनीय माहिती संकलनावर विशेष भर देण्यात आला आहे. पोलीस सूत्रांच्या मते, या साखळीमागे जिल्ह्याबाहेरून पुरवठा करणारे गट कार्यरत आहेत, ज्यांच्यावर लवकरच मोठा घाव घातला जाईल.
तसेच “तुम्ही माहिती द्या, आम्ही कारवाई करू. तुमची ओळख गुप्त ठेवली जाईल,” – अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली असून, रेवदंडा परिसर गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी जनतेच्या सहभागाचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे.
पोलिसांच्या या हालचालींना नागरिकांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी या मोहिमेचे समर्थन केले आहे. “आज पोलिसांनी फक्त धाड घातलेली नाही, तर भविष्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठीची नांदी दिली आहे,” असे मत विविध युवा कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.