रेवदंडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई…! साळाव चेक पोस्टवर १५ लाखांची वाळू जप्त

छावा दि. २१ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर)
कर्नाटकी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणतील अशी धडक कारवाई रेवदंडा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास केली आहे. पोलिसांनी उगवत्या सूर्याच्या साक्षीने साळाव चेक पोस्टवर अवैधरित्या समुद्र वाळूची तस्करी करणाऱ्यांचा काळोखा डाव हाणून पाडला.
याबाबत रेवदंडा पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सविस्तर हकीगत अशी की, २० जुलै २०२५ रोजी सकाळी ३.१५ वाजता साळाव चेक पोस्टवर करण्यात आलेल्या तपासणी दरम्यान एक ट्रक भरून सुमारे १५ लाख २६ हजार रुपयांची समुद्र वाळू पोलिसांनी जप्त केली.
सदर ट्रक (क्रमांक MH-09/EM-6930) अशोक लेलँड ३११८ मॉडेलचा असून त्याची एकटीची किंमतच १५ लाख रुपये इतकी आहे.
ट्रकमध्ये भरलेली अंदाजे ६ ब्रास वाळू हीही अनधिकृतरीत्या खणून वाहतूक करण्यात येत होती. पोलिसांनी तत्काळ वाहन ताब्यात घेतले असून वाळूसह एकूण मालमत्ता जप्तीची किंमत रु. १५,२६,७४२/- इतकी आहे.
या प्रकरणी मनोज कुमार तानाजी पाटील (वय २९, रा. कनगल, ता. हुक्केरी, जि. बेळगाव, कर्नाटक) या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा रजि. नं. ८३/२०२५ नुसार भारतीय दंड विधान कलम ३०३(२), पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ कलम १५, आणि खनिज अधिनियम कलम २१ अंतर्गत गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीचा पूर्व गुन्हेगारी इतिहास नसला तरी वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्यांना ही कारवाई चपराक ठरणार आहे.
ही ऑपरेशन पो.नि. श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर आणि पो.ह.य. पाटील यांच्या चमूने राबवली. कारवाईदरम्यान ई-साक्ष अॅपवर पंचनामा करण्यात आला असून, गुन्ह्याची शिक्षा ७ वर्षांपेक्षा अधिक होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तपास अधिक सुरू असून, “रेवदंडा पोलिसांची नजर आता अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टोळ्यांवर रोखली आहे,” असे पोलिसांकडून ठामपणे सांगण्यात आले.