रेवदंडाजवळ कोर्लई समुद्रात दिसली संशयित बोट; पाकिस्तानी खूण आढळल्याची चर्चा, संपूर्ण यंत्रणा सतर्क

छावा रेवदंडा | ७ जुलै २०२५ (सचिन मयेकर)
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथून तीन नॉटीकल मैल अंतरावर कोर्लई समुद्रात एक संशयित बोट दिसून आली आहे. ही बोट पाकिस्तानी असल्याचा प्राथमिक संशय सुरक्षायंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सदर बोटीवर पाकिस्तानशी संबंधित खूण आढळल्याची चर्चा असून, यामुळे रेवदंडा परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे ही घटना २३ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर घडली आहे. त्या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानशी असलेले करार स्थगित करून ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे कठोर प्रत्युत्तर दिले होते.

  बोट रडारच्या टप्प्यात

मात्र वादळी हवामानामुळे ती अजूनही ताब्यात आलेली नाही. भारतीय नौसेना, तटरक्षक दल आणि पोलिस यंत्रणा ती बोट शोधण्याचे प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे साळाव येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या बार्जद्वारे संशयित बोटीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 

पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास आणि शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. स्थानिक मच्छीमार आणि नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

प्रशासनाचं नागरिकांना आवाहन आहे की, कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी.

    पार्श्वभूमी

 २००८ साली कराचीहून आलेल्या दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईवर हल्ला केला होता. त्याच पद्धतीने कुठलीही शत्रू शक्ती पुन्हा वापरण्याचा धोका लक्षात घेता, ही घटना राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.

संशयित बोटीचे लोकेशन थेरोंडा जेट्टीवर; परंतु प्रत्यक्षात काहीच दिसले नाही गूढ वाढले!

दरम्यान, रायगड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित बोट दुपारी तीन वाजता थेरोंडा येथील जेट्टीवर दाखल झाल्याचे लोकेशन रडारवरून सापडले. मात्र, प्रत्यक्षात अशी कोणतीही बोट त्या परिसरात आली नसल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे.
हे लोकेशन सुरक्षा यंत्रणांच्या रडार प्रणालीवर दिसून आले असले, तरी प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार त्या वेळेस कोणतीही बोट तिथे नजरेस पडली नाही, हे विशेष आहे. त्यामुळे आता त्या बोटीच्या अस्तित्वाबाबत अनेक संशय निर्माण होत आहेत.

ती बोट खरोखर आली होती का?
आली असेल, तर किती वेळ थांबली?
ती बोट स्थानिकांच्या नजरेस का पडली नाही?
जर रडारवर स्पष्ट संकेत मिळाले असतील, तर तटरक्षक दल आणि नौदलाने तात्काळ कारवाई का केली नाही?
हे सर्व प्रश्न अजूनही गुलदस्त्यात असून, या घटनेभोवतीचे गूढ अधिकच गडद होत आहे.

 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *