रेल्वे अपघातात गंभीर जखमी प्रवाशांना उपमुख्यमंत्री शिंदेंची साथ
छावा | मु.पो. ठाणे, दि.१० | प्रतिनिधी
मुंब्रा आणि दिवा उपनगरी रेल्वे स्थानकांदरम्यान घडलेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांनी जखमी प्रवाशांची प्रकृतीची विचारपूस करत त्यांच्या उपचारांविषयी डॉक्टरांकडून सविस्तर माहिती घेतली.
या अपघातात ४ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, २ जखमी प्रवासी ज्युपिटर रुग्णालयात, तर उर्वरित जखमी प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी डॉक्टरांना या जखमींवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क – त्वरित उपाययोजनांचा दावा
मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “मुंब्रा-दिवा दरम्यानच्या अपघातासंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी तात्काळ संपर्क साधण्यात आला आहे. या मार्गावरील धोकादायक वळणावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू आहे.”
तसेच उपनगरी रेल्वेवरचा वाढता ताण लक्षात घेता पाचवी व सहावी मार्गिका लवकर पूर्ण करणे, एसी गाड्यांची संख्या वाढवणे, तसेच नॉन-एसी डब्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याची शक्यता तपासण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे भावनिक आवाहन: “या प्रवाशांची सेवा हीच खरी जबाबदारी”
मुख्यमंत्री शिंदे यांनी अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. “उपनगरीय रेल्वे ही सामान्य माणसाची जीवनवाहिनी आहे. त्यात सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. या प्रवाशांची सेवा हीच माझी जबाबदारी मानून मी स्वतः परिस्थितीचा आढावा घेत आहे,” असे ते म्हणाले.