रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे प्रशांत महासागरात त्सुनामीचा इशारा, रशिया, जपानसह हवाई बेटांना अलर्ट जारी

छावा मराठी न्यूज पोर्टल- दि.३० जुलै
रशिया : मंगळवारी रशियाच्या पूर्व किनाऱ्यावर म्हणजेच कामचटका द्वीपकल्पात ८.७ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपामुळे रशिया, पॅसिफिक बेटे आणि जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणाने त्सुनामीचे संकेत दिले असून अलास्काच्या काही भागात त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. अशा परिस्थितीत समुद्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, भूकंपानंतर त्सुनामीच्या इशाऱ्यामुळे जपान सरकारने अलर्ट जारी केला आहे. भूकंप आणि त्सुनामीच्या संभाव्यतेमुळे जपान सरकारने घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन केला. अमेरिकेच्या हवाई राज्यांतही त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेच्या पॅसिफिक त्सुनामी अलर्ट केंद्राच्या माहितीवरुन भूकंपामुळे मोठ्या त्सुनामीची शक्यता निर्माण झाली आहे. ज्यामुळे सर्व हवाईयन बेटांच्या किनारपट्टीवर नुकसान होऊ शकते.