रायगड हादरला.. वरिष्ठांच्या मानसिक छळाला कंटाळून— पोलीस निरीक्षकाचा आत्महत्येचा इशारा थेट महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांना

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल✍ राजेश बाष्टे ,|अलिबाग 📅 सोमवार | २३ फेब्रुवारी २०२६

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून एक प्रचंड खळबळजनक घडामोड समोर आली आहे. येथील एका कार्यरत पोलीस निरीक्षकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कथित मानसिक छळाला कंटाळून आत्महत्येचा थेट इशारा दिला आहे. या संदर्भात त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना सविस्तर आणि स्फोटक पत्र पाठवले आहे.

पत्रामध्ये संबंधित अधिकाऱ्याने गंभीर आरोप करत म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांत विनाकारण बदली, वारंवार अपमान आणि मानसिक दबाव टाकण्यात आला. जातीवाचक उल्लेख करून जाणीवपूर्वक छळ केल्याचाही दावा करण्यात आला आहे.

महाड शहरातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान विशिष्ट व्यक्तीला वाचवण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. मात्र, “कायद्याच्या चौकटीबाहेर कोणतीही कारवाई करणार नाही,” अशी भूमिका घेतल्यामुळेच आपण वरिष्ठांच्या निशाण्यावर आलो, असा दावा संबंधित अधिकाऱ्याने केला आहे

दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी अचानक बदली आदेश देण्यात आल्याने संबंधित अधिकारी आणि त्यांचे कुटुंब तीव्र मानसिक तणावाखाली गेल्याचे पत्रात नमूद आहे. “या सततच्या अन्यायाला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घ्यावा लागत आहे,” असा अत्यंत धक्कादायक उल्लेख या पत्रात करण्यात आल्याने संपूर्ण पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. जर एका कार्यरत पोलीस निरीक्षकाला न्याय मिळत नसेल, तर सामान्य नागरिकाचे काय? मानसिक छळ आणि बदलीचे राजकारण यावर अंकुश कोण ठेवणार? या पत्राची तात्काळ चौकशी होणार का?

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *