राज्यव्यापी संपाची हाक: रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनांचा मोर्चा तहसिल कार्यालयावर

छावा दि.०६ जून अलिबाग (सचिन मयेकर)
राज्य शासनाकडून ग्रामपंचायत कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे अखेर संतप्त कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरायचं ठरवलं आहे.
रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी कार्यकारिणी, तालुकास्तरावरील पदाधिकारी आणि सदस्यांनी एकत्र येत बुधवार, दिनांक ९ जुलै २०२५ रोजी तहसिल कार्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाद्वारे शासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जाणार आहे.
मोर्चाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शासनाच्या खालील मागण्यांकडे लक्ष वेधणे:
१) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करणे.
२) ग्रामपंचायतीच्या उत्पन्न व वसुलीच्या अटी रद्द करणे.
३) महानगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करणे.
५) ग्रॅच्युइटी नियमांत आवश्यक सुधारणा करणे.
६) पेन्शन योजना तातडीने लागू करणे.
या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून त्यासाठी वेळोवेळी निवेदने सादर करूनही शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व तालुका समित्यांना मोर्चाचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले असून, हा लढा कर्मचारी हक्कांसाठी निर्णायक ठरणार आहे.
रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना उपाध्यक्ष – गोविंद म्हात्रे