रस्त्याच्या दुर्दशेवर दिलीप अनंत जोग आक्रमक शरम तरी आहे का साहेबांनो
- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍️ सचिन मयेकर
- 📅 बुधवार , 3१ डिसेंबर २५
अलिबाग – कुरुळ ते बेलकडे हा रस्ता सर्वार्थाने जीवघेणा ठरू लागला आहे. रोड टॅक्स भरतो, PUC काढतो, नियम पाळतो, पण तरीही रस्ताच नाही असा संतप्त प्रश्न आता सामान्य प्रवासी, पर्यटक आणि ग्रामस्थ विचारू लागले आहेत. रस्त्यावर खड्डेच खड्डे असून वाहनं उजवीकडे डावीकडे टाकत जातात. प्रवास म्हणजे आट्या-पाट्यांचा खेळ झाल्यासारखं दृश्य दिसत आहे. उखडलेल्या रस्त्यातून उठणारे धुळीचे लोळ दृष्टी अस्पष्ट करतात. दोन फूट पुढे दिसत नाही. धूळ श्वासात जात असल्याने दम्याचे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांमध्ये सर्दी-खोकल्याचा त्रास वाढत आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या कामगारांनाही त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावरून जाणारी प्रत्येक दुचाकी धक्क्यांनी उडते आणि परत चारपट जोराने जमिनीवर आपटते. दहा मिनिटांचा प्रवास अर्धा-पाऊण तास घेतो. पर्यटक म्हणतात, आम्ही कर, टॅक्स, PUC सगळं भरतो, मग प्रशासन जबाबदारी का पाळत नाही.

या परिस्थितीवर खड्डे अॅक्टिव्हिस्ट दिलीप अनंत जोग मैदानात उतरले आहेत. त्यांनी २९ डिसेंबर रोजी MSIDC, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना तक्रारपत्र पाठवून सात दिवसांत कारवाई न झाल्यास रस्ता रोको व लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या पत्रात म्हटले आहे की रस्ता MSIDC कडे गेल्याचे समजते, कोटींचे काम मंजूर झालं पण दोन महिने काम कासवगतीने, आता तर थांबले. रस्त्यावर उखडलेले JSW स्लॅग धुळीत रूपांतरित झाले असून नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. कुरुळ बायपास ते बेलकडे या काही किलोमीटर पट्ट्यात अवैध आणि शास्त्रोक्त नसलेले स्पीडब्रेकर्स बसवले गेले आहेत. खड्डे आणि अर्धवट कामामुळे वाहतूक सतत मंदावते, काही किरकोळ अपघात घडत आहेत. रस्त्यालगत वाढलेली झुडपे हटवली गेलेली नाहीत. सर्वात वाईट बाब म्हणजे अधिकारी शांत आणि लोकप्रतिनिधीही मौन. जनतेला हालांमध्ये टाकून त्यांना शरमही वाटत नाही, असा आरोप जोग यांनी केला आहे.
अलिबाग ते रेवदंडा या मार्गावरील हाच पट्टा पर्यटनासाठी महत्त्वाचा असून काशिद-मुरूडकडे जाणाऱ्या पर्यटकांना सर्वाधिक फटका बसतो. सोशल मीडियावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे आणि रस्ता पाहून अलिबागचे पर्यटन शहराचे नाव खराब होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या मते आताच काम सुरू झाले नाही तर आंदोलन अपरिहार्य होईल. ग्रामस्थांचा आवाज आता एकाच वाक्यात दणक्यात उमटत आहे. रोड टॅक्स भरतो, PUC काढतो मग रस्ता कोण देणार. प्रशासन आता जागं होणार का की जनता आंदोलनाच्या रस्त्यावर उतरेल, हा निर्णायक प्रश्न हवेत लटकलेला आहे.
![]()

