रविवार विशेष — न भूतो न भविष्यती शिवरायांचे सुवर्ण सिंहासन 

रविवार विशेष 

स्रोत नोंद व ऐतिहासिक आधारे लेखन

हा लेख शिवकालीन इतिहासाचे प्रमाणभूत ग्रंथ जसे शिवछत्रपतीचा राज्याभिषेक बखर सब्हासद बखर चित्निस बखर राजवाडे संशोधन मंडळाचे स्त्रोत शिवकालीन शासनव्यवस्था ग्रंथ रायगड राज्याभिषेक सोहळ्याच्या पुरातन नोंदी गजानन मेहेंदळे लिखित शिवाजी अँड हिज टाइम्स इतिहास संशोधकांनी उपलब्ध केलेले पुरावे रायगड पुरातत्व अभ्यास आणि तौलनिक संदर्भ यांच्या अभ्यासातून एकत्रित केला आहे ३२ मन सुवर्ण सिंहासनाची माहिती रामाजी दत्तोजी चित्रे यांच्या उल्लेखांवर आधारित आहे सोन्याचे मन ते किलो आणि तोळ्यातील रूपांतरण जुने भारतीय वजनमानानुसार करण्यात आले आहे कर महसूल प्रणालीची माहिती चौथ सर्देशमुखी महसूल प्रकरणांवरील इतिहास अभ्यासातून घेतली असून सर्व घटक जोडून हा लेख संशोधनात्मक आणि ऐतिहासिक भावनेने सादर केला आहे

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
✍️ सचिन मयेकर
📅 रविवार , २८ डिसेंबर २५

रायगड हा किल्ला नाही तो इतिहासाचा धगधगता अंगार आहे त्याच्या दगडांत लढाया झोपलेल्या आहेत तटबंदीवर अजूनही घोड्यांच्या टापा ऐकू येतात आणि त्या वाऱ्याच्या झोतांतून अचानक एक किरण चमकतो तोच शिवरायांच्या सुवर्ण सिंहासनाचा प्रकाश राज्याभिषेकाचा दिवस म्हणजे जणू सह्याद्रीवर देवांनी उतरणे होते सूर्य लाल सोन्यात माखल्यासारखा रायगडावर उभा होता सभागृहात ढोल ताशांचा निनाद होता आणि त्या तेजाच्या केंद्रस्थानी होतं ३२ मन सोनं आणि रत्नांनी जडलेलं सिंहासन एक असे सिंहासन जे ना पूर्वी जन्मले ना पुन्हा कधी जन्माला येईल म्हणूनच त्याला म्हणावं लागलं न भूतो न भविष्यती

शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले ते तलवारीने हो पण त्याचे राजमुकुट स्वाभिमानाने बनले त्या मुकुटाला आधार द्यावा अशी कल्पना झाली सुवर्ण सिंहासनाची महाराजांनी सुवर्णकार रामाजी दत्तोजी चित्रे यांच्यावर विश्वास ठेवला आणि काम सुरू झाले हस्तक सोनं गरम करत होते चामखळणारं गरमपण हातांना भाजत होतं तरी हातोड्याचे आवाज थांबत नव्हते रात्री तेलदिव्याच्या प्रकाशात सोन्याचे कण तांबूस प्रकाशाने उडत होते हिर्‍यांची लखलख पाचूचा शितल हिरवा निळ्या निळ्या रत्नांचा थाट आणि सिंहमूडकाठी कोरलेली शौर्याची मूर्ती जणू सह्याद्रीच उभा झाला होता वर मेघडंबरी खाली रुबाबदार पायऱ्या आणि मध्ये फक्त तेजच तेज

राज्याभिषेकाचा दिवस जसाच्यास तसा पहाट नव्हती सूर्योदय नव्हता तर वाटत होतं सूर्य स्वतः रायगडावर उभा राहिला आहे पवित्र जल महाराजांच्या शिरावर पडले त्या क्षणी सभागृहात प्रसन्न गंध होता आणि सिंहासनावर बसताना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य जगापुढे साकारले तो क्षण जणू काळाने खांद्यावर घेतला स्थिर झाला इतिहास थांबला आणि सोनं प्रकाशाचा महासागर बनलं

आता प्रश्न जगाला खुणावतो ३२ मन सोनं म्हणजे किती एक मन साधारण साडेचार किलो मोजले तर ३२ मन म्हणजे साधारण एकशेचवाळीस ते एकशेचौऱ्याऐंशी किलो सोनं आणि जुने वजनमान धरून हे बारा हजार तोळ्यांपेक्षा जास्त होते आजच्या सोन्याच्या भावाने मोजल्यास हे शंभर कोटी ते एकशेवीस कोटी रुपयांहून अधिक मूल्याचं असेल हा विचारही अंगावर रोमांच आणतो रायगडात त्या रात्री सूर्य सोन्यापेक्षा उजळ दिसला असे का वाटत असेल कदाचित सभागृह झळाळून गेले असेल

पण एवढं सोनं कुठून आलं हा प्रश्न साक्षात तपास आहे शिवरायांनी लुट केली नाही स्वराज्यासाठी युद्ध केलं सूरत मोहिमेत मोठा खजिना मिळाला मुघलांकडून मिळालेल्या दंडातून रत्ने मिळाली पराभूत सरदारांकडून करस्वरूप धन मिळाले पण केवळ युद्ध नव्हे तर राज्यव्यवस्था शिस्तीत होती चौथ सर्देशमुखी महसूल कार्यकारी पद्धतीने वसूळ होत होता व्यापारी मार्ग मराठी छत्राखाली होते समुद्र व्यापारातून माल नाणी पैसाधान्य जमा होत राहिले शेतकऱ्यांचा कर सन्मानाने घेतला गेला आणि त्यामुळे राज्याचा खजिना शांतपणे पण सातत्याने भरत राहिला आणि ते खजिन्यातील सोनेच एका दिवशी सुवर्ण सिंहासन झाले

इतिहासाचा प्रवाह पुढे गेला संभाजी महाराजांची कालखंडात आंधी आली मुघलांचा विळखा आवळला युद्धे झाली रायगड गेला राज्य उलथलं सिंहासनाचा पुढचा धागा अचानक तुटतो काही म्हणतात ते गुप्तपणे जमीनखाली पुरलं गेलं काही म्हणतात युद्धकाळात तुकडे करून सुरक्षित नेलं काही म्हणतात वितळवून निधीत वापरलं कदाचित ते अजूनही रायगडाच्या गर्भात मूक झोपले असेल कोणास ठाऊक इंग्रजांच्या कागदपत्रात मोठ्या सोन्याच्या हस्तगतची नोंद नाही याचा अर्थ सोनं त्यांच्या हातात गेलं नाही असाही अंदाज येतो नोंदी शांत आहेत पण रायगडचा वारा आजही गूढ सांगतो सिंहासन हरवलं पण तेज नाही

आज रायगडावर सिंहासनाचा चौथरा आहे पुतळा आहे दगडांच्या रेषांमध्ये इतिहास जिवंत आहे प्रवासी तिथे उभा राहिला की अंगात शहारे येतात जिथे शिवराय बसले होते तिथे आज आपण डोळे मिटून उभे राहिलो तर सोन्याचा प्रकाश मनात उमटतो आणि आपल्याला जाणवतं की सिंहासन कोणी चोरलं नाही ते काळाने लपवलं असेल पण ते मरण पावलेलं नाही ते प्रत्येक मराठीच्या छातीत तेजासारखं बसलेलं आहे

सोनं वितळलं तर हरवतं पण स्मृतीत कोरलेलं सोनं वितळत नाही इतिहास सांगतो सिंहासन हरवलं पण शिवरायांचे तेज अमर राहिलं म्हणूनच आजही म्हणतो न भूतो न भविष्यती

अंतिम टीप

हा लेख उपलब्ध बखरी इतिहासग्रंथ संदर्भ संशोधन आणि अभ्यासातून एक महिन्याच्या वाचनानंतर संकलित केला आहे भविष्यात नवीन पुरावे उपलब्ध झाल्यास योग्य त्या दुरुस्तीसाठी आमची तयारी आहे माहितीतील सूक्ष्म त्रुटी असल्यास असमजून घ्यावे उद्देश फक्त इतिहासप्रेम वाढवणे आणि स्वराज्याची ज्योत मनांत प्रज्वलित ठेवणे आहे

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *