मोबाईल चोरीच्या वादातून कोयत्याने हल्ला – महिला जखमी; रेवदंडा पोलिसात गुन्हा दाखल

छावा – रेवदंडा| सचिन मयेकर |२३ जुलै २०२५
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सागवाडी ता. अलिबाग एका शेतात भात लावणीदरम्यान मोबाईल हरवल्याच्या संशयातून वाद उफाळून कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात गीता राजा शिद या महिला जखमी झाल्या असून याप्रकरणी रमेश हशा शिद याच्याविरुद्ध रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गीता राजा शिद या आपल्या शेतामध्ये भात लावणीच्या कामासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत एक टोपली होती, ज्यात त्यांनी लोखंडी कोयता आणि स्वतःचा मोबाईल ठेवून ती टोपली बांधावर ठेवली होती. शेतीचे काम आटपून जेवणासाठी त्या दुपारी एकच्या सुमारास बांधाजवळ आल्या असता, त्यांना मोबाईल मिळाला नाही.
यावेळी त्यांनी आपले दीर रमेश हशा शिद यांना मोबाईलबाबत विचारणा केली. त्याचा राग मनात धरून रमेश यांचा मुलगा दिनेश रमेश शिद याने गीता यांना शिवीगाळ करत कानाखाली चापट मारली व हाताने गळा दाबून धक्काबुक्की केली. त्यावेळी गीता यांचे पती आणि मुलगा यांनी हस्तक्षेप करून त्यांना वाचवले व मोबाईल परत देण्यास सांगितले.
मात्र रागाच्या भरात रमेश हशा शिद याने टोपलीतील लोखंडी कोयता उचलून गीता यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गीता यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला असता कोयत्याचा घाव त्यांच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर बसला आणि त्या गंभीर जखमी झाल्या.
या प्रकरणी भारतीय दंड विधान संहिता कलम 118(1), 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुजित सुरेश कुंभार करीत आहेत.