मुरुड-साळाव रस्त्यावर भीषण अपघात : एस.टी.-टेम्पोची धडक, १२ जखमी
“मुरुड-साळाव रस्त्यावर नबाबाचा राजवाडा ते विहूर दरम्यान दुपारी झालेल्या भीषण अपघातात एस.टी. बस व पीकअप टेम्पोची जोरदार धडक होऊन १२ जण जखमी झाले. यातील ४ जण गंभीर जखमी असून सर्वांना पुढील उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.”
छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर —मुरुड— शनिवार २७ सप्टेंबर २०२५

याबाबत समजते की, मुरुड तालुक्यातील मजगाव येथील काही महिला दर्शनासाठी मुरुडच्या कोटेश्वरी मंदिरात गेल्या होत्या. दर्शन करून परतताना त्यांचा पीकअप टेम्पो नबाबाचा राजवाडा ते विहूर दरम्यान वाकड्या आब्याजवळ आला असता, समोरून येणाऱ्या मुरुड आगाराच्या अलिबाग-मुरुड एस.टी. बसशी टेम्पोची भीषण धडक झाली.

या अपघातात टेम्पो चालक जय इंद्रजित करंदीकर, अलका मुंबईकर, जीवन गोयजी, रेखा भगत (थेरोंडा) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर निरजला जगू, मनीषा मुंबईकर, ओवी पोवळे, वैशाली तबीब, सविता कारभारी (रोहा-अष्टमी), कल्याणी करंदीकर हे इतर प्रवासी जखमी झाले असून सर्वांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघाताचे वृत्त समजताच तहसीलदार आदेश डफळ, पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे व आगार प्रमुख राहुल शिंदे घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने मुरुड ग्रामीण रुग्णालयात हलवून प्राथमिक उपचार करण्यात आले, त्यानंतर अलिबाग येथे हलविण्यात आले.
सदर अपघाताचा पुढील तपास पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दिनेश गायकवाड करीत आहेत.
![]()

