मुंबईत मुसळधार पावसाचा कहर

हवामान खात्याचा रेड अलर्ट
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मुंबई | छावा ; ७ जून, वृत्तसंस्था | मुंबई आणि परिसरात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, भारतीय हवामान खात्याने पुढील ३ तासांसाठी ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. यामुळे मुंबईकरांनी अत्यंत आवश्यक असेल, तेव्हाच घराबाहेर पडावे, असा सल्ला मुंबई महापालिकेने दिला आहे.
मुंबईत मान्सून काही दिवसांपूर्वी दाखल झाला होता. त्यानंतर काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुढील काही तास अतिवृष्टीसह वाऱ्यांचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई, नवी मुंबई आणि रायगड परिसरात जोरदार पावसासह ४० ते ५० किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाचा जोर अधिक असलेले भाग

- दक्षिण मुंबई: चर्चगेट, फोर्ट, महालक्ष्मी
- मध्य मुंबई: दादर, लोअर परळ, मुंबई सेंट्रल, माटुंगा
- पूर्व उपनगरे: सायन, कुर्ला, घाटकोपर, पवई, भांडूप
या भागांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबईकरांनी घरात राहून सुरक्षितता पाळावी. शाळा, ऑफिसमधील उपस्थितीबाबत अधिकृत घोषणा येईपर्यंत प्रतीक्षा करावी. कोणतीही आपत्ती, मदत किंवा अडचण असल्यास BMC नियंत्रण कक्ष: १९१६ वर संपर्क साधावा, मुंबई महानगरपालिका यांचेकडून करण्यात आले आहे.