माथेरानमध्ये चोरट्यांनी दुकान फोडले

माथेरान | प्रतिनिधी २० जुलै
माथेरानमधील इंदिरा गांधी नगर येथील साईसृष्टी कोल्ड्रिंग व किराणा स्टोअरमध्ये शुक्रवारी रात्री चोरट्यांनी घातकी चोरी केली. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे टाळे व कड्या उचकटून दुकानात प्रवेश करत रोकड तसेच सिगारेटच्या पॅकेट्ससह अंदाजे १५ ते २० हजार रुपयांचा माल लंपास केला.
दुकानाचे मालक महेंद्र सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी मागील दरवाजातून दुकानात प्रवेश करून समोरील दरवाजा, मशीनचा भाग आणि आतील दरवाजाचे कुलूप तोडले. त्यांनी तीन दरवाजे तोडत दुकानात प्रवेश केला होता.
या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. माथेरान पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ए. ए. सोनेने व सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गिरी हे प्रकरणाचा तपास करत आहेत.
या घटनेनंतर स्थानिक व्यापाऱ्यांनी पोलिस ठाण्याकडे सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. कारण, वीकेंड आणि सुट्ट्यांच्या काळात माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची वर्दळ वाढते. त्यामुळे अनेक अनोळखी व्यक्ती परिसरात येत असतात. अशा परिस्थितीत चोरीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी या व्यक्तींची ओळख तपासली जावी, त्यांचे ओळखपत्र पोलिसांकडे नोंदवले जावेत, आणि नेमकं गस्त पथक सक्रिय ठेवण्यात यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.