मराठी माणसाच्या अब्रूवर घाव? — अलिबागमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा

छावा रेवदंडा | ८ जुलै २०२५ (सचिन मयेकर)
मुंबईतील मीरा रोड परिसरात परप्रांतीय व्यावसायिकांकडून काढण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आता रायगड जिल्ह्यातही संतापाची लाट पसरताना दिसत आहे. अलिबागमध्ये देखील असाच प्रकार घडल्याने मनसे आक्रमक झाली आहे.
मनसे अलिबाग तालुकाध्यक्ष श्री सिद्धू म्हात्रे, महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष महेश घरात, आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अलिबाग बाजारमधील एका दुकानदाराने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर मराठी माणसाला उद्देशून आक्षेपार्ह मजकूर ठेवला होता. त्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली.
मनसे सैनिकांनी तात्काळ अलिबाग बाजारात जाऊन संबंधित व्यक्तीस जाब विचारला. त्या वेळी मनसेच्या वतीने स्पष्ट शब्दांत इशारा देण्यात आला –
“मराठी माणसाला माज दाखवायचा प्रयत्न कराल तर कानाखाली आवाज काढू नक्की! तुम्ही इथे व्यापार करायला आला आहात, गपचूप व्यापार करा.”
यावेळी वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं होतं, मात्र संबंधित व्यक्तीने आपली चूक मान्य करत महाराष्ट्र सैनिकांची माफी मागितली आहे.
या घटनेमुळे अलिबाग परिसरात एकच खळबळ उडाली असून, मनसेने स्पष्ट इशारा दिला आहे की, मराठी अस्मितेला कोणीही डिवचण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना त्वरित उत्तर दिलं जाईल.