मराठी पाऊल पडते पुढे……

राजधानीत महाराष्ट्राची ओळख घडवणाऱ्या माहिती केंद्राचा निवासी आयुक्तांकडून गौरव
• छावा • नवी दिल्ली, दि. ११ जून • वृत्तसंस्था
गेल्या ६५ वर्षांपासून राजधानी दिल्लीत महाराष्ट्राची सकारात्मक व सर्वांगीण प्रतिमा साकारण्यात महाराष्ट्र माहिती केंद्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला यांनी सद्भावना भेटीदरम्यान केंद्राच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती घेतली आणि मराठी समाजाच्या सक्षमीकरणासाठी केंद्राच्या कार्याचे कौतुक केले.
माहिती केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) सौ. मनीषा पिंगळे यांनी आर. विमला यांचे स्वागत केले. यावेळी खासदारांसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या नव्या माहितीपुस्तिकेचे त्यांनी निवासी आयुक्तांना सादरीकरण केले.
केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची, प्रकाशनांची व कार्यक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. येत्या काळात महाराष्ट्र माहिती केंद्र आणि महाराष्ट्र सदनामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आर. विमला यांनी कार्यालयाची पाहणी करताना ग्रंथालयासही भेट दिली. तेथील दुर्मीळ ग्रंथसंपदा आणि संदर्भसाहित्याचे त्यांनी कौतुक केले.
“महाराष्ट्र माहिती केंद्र, नवी दिल्ली येथे दिलेली भेट अत्यंत समाधानकारक होती. केंद्रामार्फत प्रकाशित ग्रंथ आणि ग्रंथालयातील संग्रह उत्कृष्ट आहे. केंद्राचे कार्य अत्यंत स्तुत्य आहे. सर्व कर्मचाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.” :-आर. विमला, महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्त – नवी दिल्ली
या भेटीदरम्यान माहिती अधिकारी अंजू निमसारकर कांबळे, लघुलेखक कमलेश पाटील, अधीक्षक रघुनाथ सोनवणे, ग्रंथपाल रमेश्वर बर्डे, सहाय्यक अधीक्षक राजेश पगडे, उदय वीर सिंग, किशोर वानखेडे, निलेश देशमुख, प्रशांत शिवरामे, पाले, किशोर गायकवाड, अमिका मेहतो, दीपक देशमुख यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.