भामट्या -विकासाचा रस्ता… आणि विस्थापनाच्या वळणावर विसावलेली स्वप्नं.

भामट्या विशेष लेख
दिनांक : ५ ऑगस्ट २५
काल एक वृद्ध मावशी भेटल्या. घरगुती झोपडीपाशी ओढलेलं पिवळसर प्लास्टिक, आणि त्याखाली तोंड झाकून झोपलेली दोन लहान मुलं. त्या मावशी म्हणाल्या,
बाबा, घरकुलासाठी नाव दिलंय… आता वाटच पाहतोय.
मी गप झालो… काय उत्तर देणार?
एका बाजूला महामार्गाचे डोंगर ढासळून समतल करणाऱ्या जेसीबीचा आवाज –
आणि दुसऱ्या बाजूला, छपराचा कोपरा दोरीने बांधणारी ती बाई.
हे नेमकं काय चाललंय? विकास की विस्थापन?
महामार्ग हवा.
गाव पुढं जावं, त्याला कोणी विरोध करत नाही.
पण त्या रस्त्यावरून जाण्यासाठी कोणाच्या घराचा दरवाजा तोडायचा?
मी पाहिलं –
महामार्गासाठी आलेल्या मजुरांसाठी दोन आठवड्यांत उभ्या राहिलेल्या पत्र्याच्या वसाहती…
तिथं पाणी, वीज, डबा – सगळं काही.
आणि गावातल्या घरकुलासाठी?
वर्षानुवर्षं मंजुरीच्या आश्वासनावर जगणारी माणसं!
गावात घर नाही, पण कागदावर नाव आहे…
घरकुलासाठी अर्ज केलेले आहेत
कधी मंजुरी नाही,
कधी निधी नाही,
कधी ना तांत्रिक अडचणी!
आणि आज, त्याच घरावर नोटीस
घर पाडा!
“कुठं जाऊ भामट्या?
हा प्रश्न माझ्या कानात घुमतोय.
म्हणजे –
ज्यांनी इथं आयुष्य घालवलं, त्यांचं घर तुटतं…
आणि जे दोन दिवसांपूर्वी आले, त्यांचं घर उभं राहतं?
गावकऱ्यांना प्रतीक्षा… मजुरांना तत्काळ निवास!
महामार्गावर काम करणाऱ्या बाहेरच्या मजुरांसाठी:
पत्र्याची घरे
वीज आणि पाणी
सुरक्षित निवास
हे सगळं काही दिवसांत उभं केलं जातं.
मग स्थानिकांच्या घरकुलासाठी वर्षानुवर्षं का?
ग्रामपंचायतींचे प्रयत्न – पण अडथळ्यांची शर्यत
ग्रामपंचायती आपल्या परीने पाठपुरावा करतात,
पण…
निधी वेळेवर मिळत नाही
फाईल्स विभागांमध्ये अडकतात
प्रक्रियेला लागतात महिने
..आणि दरम्यान, लोकांच्या आशा धूसर होत जातात.
पर्यायी जागा हक्काने मिळायला हवी!
महामार्ग आवश्यक आहे –
पण ज्यांचं घर मोडणार, त्यांना
तात्पुरता निवास
न्याय्य नुकसानभरपाई
आणि किमान माणुसकी
ही फक्त कागदी औपचारिकता नाही –
तो त्यांचा हक्क आहे!
शेवटचा सवाल…
“घर” म्हणजे फक्त भिंती नाहीत –
ती आठवणींची शिदोरी असते,
ती आपुलकीचा निवारा असतो,
ती हक्काची जागा असते.
महामार्ग झपाट्याने होतोय,
मजुरांची वस्ती तयार होते,
पण स्थानिक गरिबाचं घर आजही अधुरं आहे…
हीच आजच्या विकासाची सर्वात मोठी शोकांतिका नाही का?
भामट्या