भामट्या – ती आजी आणि पोटाची खळगी…

दिनांक : ७ ऑगस्ट २०२५
लेखक : भामटा
रेवदंडा–अलिबाग महामार्गावरून मी चालत होतो.
रात्र झालेली – साधारण अकरा वाजले असावेत.
नागावच्या रस्त्यावर उजेड विरळ, पण मनात विचारांची गर्दी.
तेवढ्यात समोरून येताना दिसली – एक आजी.
वय सुमारे ऐंशी. अंग झुकलेलं, हातात एक जुनी काठी.
तिरक्या पावलांनी, पण ठामपणे चालत होती.
क्षणभर विचार आला – एवढ्या रात्री ही वृद्ध स्त्री रस्त्यावर?
घर असणार… पण पानात काहीच नसलं असावं.
कदाचित दोन घास मिळावेत म्हणून,
ती नातेवाईकांकडे पोटाची खळगी भरायला निघाली असावी.
ती काहीच बोलली नाही, पण तिचा चेहरा, तिचं चालणं –
सगळं काही सांगून गेलं.
भूक ही केवळ पोटाची नसते…
ती माणसाच्या अस्तित्वाची असते.
आपण म्हणतो – “देश प्रगती करतोय…”
हो, पण त्या प्रगतीत ही आजी कुठे आहे?
ज्या घरात ती राहते तिथं जेवण नाही,
आणि जिथं ती जाते तिथं सुद्धा खात्री नाही.
पण चालणं तिचं थांबत नाही –
कारण भूक ही माणसाला झोपवत नाही… चालायला लावते.
त्या वृद्ध पावलांमध्ये एक वेगळी ताकद होती
जगण्याची, लढण्याची… आणि उपेक्षेवर मात करण्याची.
मी चालत राहिलो,
पण मन मात्र तिच्या पावलांमागे अडकून बसलं होतं.
भामटा