भामट्या – घर आहे, झोप नाही… मच्छरांनी घातलेली रक्त पार्टी 

दिनांक : ६ ऑगस्ट २०२५

लेखक : भामटा

गावातल्या एका जुन्या घरात आज मी मुक्काम ठोकलाय.

मातीची भिंत, कौलारू छप्पर, आणि उघडं अंगण — अगदी गोडसं, आपलंसं घर.

पण रात्र झाली, आणि माणसं झोपली तशी – मच्छरांची जत्रा सुरु झाली.अक्षरशः वाटलं मच्छरांनी रक्त पार्टी सुरु केली.

दरवाज्याच्या जाळीतून, खिडकीतून, बाथरूमच्या गाळातून आणि घराच्या आडोशातून – मच्छर बाहेर आले.

ते पाणी फक्त सांडपाणी नाही – ते मच्छरांची पैदास बनवणारं एक गरम अड्डं आहे!
आणि त्यावर मच्छरांच्या पिलांचं ‘पारंपरिक’ पोषण चाललंय.

एक आजी – दोन उशा घेऊन सुद्धा मच्छरांनी शरण जावं म्हणून झोपलेल्यावर ओढणी डोक्यावर बांधून झोपतायत… पण त्यांच्या कानाजवळ “sshhhhhh…” आवाज सुरूच.

कधी काठीने पंखा, कधी मातीचा दिवा विझवून अंधार करून मच्छर घालवायचा प्रयत्न… पण मच्छरही गावातले – “आपलेच”, चिकटून राहतात.

एका खोलीत बाळ रडतंय. आई म्हणते, “रात्री तीन वाजता अंगावर मच्छर डंखलेले, ताप चढला.”

औषध नाही, मच्छरदाणी नाही.

ज्यांना दुपारी शेतात राबून रात्रभर झोपायचं असतं, त्यांनाही आता झोप म्हणजे नशिबाची गोष्ट वाटतेय.

गावात घर आहे… पण झोप नाही!

मातीच्या चुलीत ऊब आहे… पण झोपेच्या जागी असतो मच्छरांचा उपदराव.

मी

“भामटा”, हे सारं पाहतोय.

निव्वळ मच्छर नाहीत हे… हे आरोग्याचं संकट आहे, गरीबाच्या झोपेवरचा डल्ला आहे.

गावातल्या असंख्य ठिकाणी – उघड्या नाल्या, न वापरलेले ड्रम, प्लास्टिकच्या बादल्या, फुटके डबे, टाक्या, फुटलेले पाइप, घरामागील सांडपाण्याचे चर – या सगळ्यांत सतत पाणी साचलेलं असतं. त्या साचलेल्या पाण्यात ऊब टिकून राहते, आणि तिथंच मच्छरांची अंडी फुटतात, पिले तयार होतात. हीच मच्छरांची पैदास आहे – जी दिवसागणिक वाढतच चाललीय. हे पाणी न साफ केल्याने आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने आज गावोगावी मच्छरांचा त्रास भयंकर वाढलाय. मच्छरदाण्या नसलेल्या घरांमध्ये झोपणं म्हणजे आरोग्याशी खेळ करणं झालंय.
या सगळ्याला जबाबदार आहे – एकीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष, आणि दुसरीकडे गावकऱ्यांमध्ये स्वच्छतेबाबत अजूनही नसलेली जागरूकता.

भामटा

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *