भाजप आणि काँग्रेस विरहित शिवसेना हीच महाराष्ट्राची गरज
महायुतीला घरातील नेत्याचाच आहेर

अखंड शिवसेनेच्या पुनर्स्थापनेसाठी ठाकरे बंधूसह शिंदेंनाही गजानन कीर्तिकरांची भावनिक साद
मुंबई | छावा, दि.०७, वृत्तसंस्था | “भाजप आणि काँग्रेस विरहित शिवसेना हीच महाराष्ट्राची गरज आहे.” असे वक्तव्य करत गजानन कीर्तिकर यांनी महायुतीला घरचाच आहेर दिला आहे. या त्यांच्या कृतीमुळे शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
कधीकाळी ठाकरे गटात महत्त्वाचं स्थान असलेले, ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी शिवसेनेच्या एकतेसाठी भावनिक आणि राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण अशी साद घातली आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनी एकत्र येऊन ‘अखंड शिवसेना’ पुन्हा उभी करावी, अशी प्रखर मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत अधिक स्पष्टता देताना त्यांनी पुढे म्हटलं, “उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची साथ सोडली पाहिजे आणि राज ठाकरे कधीच भाजपसोबत गेलेले नाहीत. शिवसेना जर पुन्हा एकत्र आली, तर ती महाराष्ट्राच्या राजकारणातील सिकंदर ठरेल.”
शिवाय गजानन कीर्तिकर यांनी शिवसेनेच्या एकतेसाठी अडथळा ठरणाऱ्या ‘अदृश्य शक्तीं’वर देखील निशाणा साधला. “शिवसेना पुन्हा एकत्र येऊ नये, म्हणून काही अदृश्य शक्ती ‘मिठाचा खडा’ टाकतात. त्यांचे मनसुबे स्पष्ट आहेत. ते नाव घेण्यास मी टाळतो, पण उद्दिष्ट हेच आहे—शिवसेना एकत्र येऊ नये.”

कीर्तिकर यांचे हे वक्तव्य आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं ठरत आहे. राज्यातील शिवसेना प्रेमी जनतेमध्ये आजही एकत्रित शिवसेनेची ओढ जिवंत आहे, याचे प्रतिबिंब या वक्तव्यात दिसत आहे.