भाग ७ – शाहूंचा उदय: संयमाचं फळ, स्वराज्याची नवी पहाट.

लेखक: सचिन मयेकर | छावा – विशेष लेखमाला
दि. ०३ ऑगस्ट २०२५
प्रस्तावना
सूर्य मावळला होता… पण त्याच्या किरणांनी नवं सूर्यकुल उगम पावलं होतं.
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर संपूर्ण मराठा साम्राज्यावर शोककळा पसरली होती.
पण त्या अंधारातही एक दीप तेवत होता संभाजी महाराजांचा पुत्र शाहू”
औरंगजेबानं केवळ संभाजी महाराजांनाच नव्हे, तर त्यांची पत्नी येसूबाई आणि पुत्र शाहू यांनाही कैद केली होती.
या बंदिवासात येसूबाईंनी ज्या संयमाने, शिस्तीने आणि धीराने शाहूंचं पालनपोषण केलं –
त्यामुळे शाहूंच्या मनात एकच गोष्ट ठसली – स्वराज्य, स्वाभिमान आणि न्याय!
येसूबाईंचा प्रत्येक दिवस, प्रत्येक श्वास हा त्याग होता –
ते त्यांनी शब्दाविना, विनातक्रार पार पाडला!
शाहू महाराज बालवयातच औरंगजेबाच्या बंदिवासात गेले.
त्यांचं शिक्षण, वाढ, संस्कार सगळं मुघल नजरकैदेतच घडलं.
पण त्या बंदिस्त जगातसुद्धा शाहूंनी धर्म आणि मराठ्यांचा स्वाभिमान कायम जपला.
कित्येक वेळा त्यांना आकर्षण, धमक्या, गुप्त मोहिमांद्वारे फसवण्याचा प्रयत्न झाला…
पण संभाजी महाराजांच्या रक्तातला अभिमान आणि येसूबाईंचा शिस्तबद्ध पोषण
हा शाहूला वाकवू शकला नाही.
१७०७ साली औरंगजेबाचा मृत्यू झाला.
मुघल साम्राज्यांत सत्तासंघर्ष सुरू झाला.
म्हणूनच शाहू महाराजांना राजकीय डावपेच म्हणून सोडण्यात आलं –
पण हीच झाली स्वराज्याच्या पुनरुत्थानाची पहाट!
शाहू महाराज बाहेर पडले… पण फक्त शरीरानं नव्हे –
ते बाहेर पडले एक नवा तेजस्वी सूर्य होऊन!
बाहेर आल्यानंतर शाहूंना आपलं हक्काचं स्वराज्य पुन्हा मिळवावं लागलं.
त्यात त्यांना ताराबाई यांचा विरोध, अंतर्गत संघर्ष, सरदारांतील फुटी – याचा सामना करावा लागला.
पण ते कुठेही डगमगले नाहीत.
शेवटी शाहू महाराजांनी छत्रपती पद भूषवून पुन्हा एकदा स्वराज्याला दिशा दिली.
त्यांच्या सत्ताकाळातच पेशवाईची सुरुवात झाली, आणि स्वराज्याचं विस्तारीकरण घडलं.
संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर, जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटत होतं… तेव्हा त्या राखेतून उगम पावला – शाहू!
हे फक्त एक नाव नव्हतं – हे होतं संयमाचं फळ, येसूबाईंचं उत्तर आणि स्वराज्याच्या पुनरुज्जीवनाची ग्वाही!