भाग ३ – १३ ऑगस्ट १९४७ : अंतिम तयारी – रोषणाईच्या प्रकाशात दडलेली काळोखी रात्र

दिनांक : १३ ऑगस्ट २०२५
लेखक : सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल
दिल्लीची रोषणाई, पण सीमारेषेचं गूढ
१३ ऑगस्ट १९४७. स्वातंत्र्य फक्त दोन दिवसांवर आलं होतं. दिल्लीचे रस्ते तिरंग्यांच्या ओळींनी सजले होते, दुकानांत देशभक्तीच्या बॅजेस आणि कागदी झेंडे विक्रीसाठी मांडले होते. सरकारी इमारतींना रोषणाई लावण्याचं काम दिवसरात्र सुरू होतं.
पण या उजेडामागे एक काळं गूढ होतं भारत-पाकिस्तानची सीमारेषा अजूनही गुप्त होती. सर सिरिल रेडक्लिफ यांच्या टेबलावर नकाशा तयार होता, पण ती रेषा कुठून जाणार हे अजून कोणालाही माहीत नव्हतं. लाखो लोकांचं भविष्य जणू बंद कपाटात अडकलं होतं.
संविधान सभेची तयारी आणि नेहरूंचा ऐतिहासिक क्षण
दिल्लीतील संविधान सभेत १५ ऑगस्टच्या मध्यरात्री होणाऱ्या अधिवेशनाची सराव बैठक सुरू होती. पंडित नेहरू आपलं प्रसिद्ध Tryst with Destiny भाषण पुन्हा पुन्हा वाचत आणि सुधारत होते. प्रत्येक शब्द तोलून मांडला जात होता, कारण हे भाषण केवळ भारतीय जनतेसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी होणार होतं. नेहरूंच्या चेहऱ्यावर जबाबदारीचं ओझं आणि स्वातंत्र्याच्या आनंदाची चमक दोन्ही दिसत होती.
गांधजींचा वेगळा मार्ग हिंसा थांबवण्याची धडपड
महात्मा गांधी मात्र दिल्लीपासून दूर, कोलकत्त्यात होते. बंगालमध्ये उसळलेल्या सांप्रदायिक दंगली थांबवण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत होते. १३ ऑगस्टच्या दिवशी त्यांनी उपोषणाची तयारी सुरू केली होती. त्यांचा विश्वास होता स्वातंत्र्याचं पहिलं पान रक्ताने माखलं जाऊ नये, तर त्यावर शांततेची सही व्हावी.
दोन टोकांचा भारत
शहराच्या एका टोकाला देशभक्तीची गाणी, मुलांच्या जय हिंद च्या घोषणा, रोषणाईने उजळलेले रस्ते… आणि दुसऱ्या टोकाला रेल्वे स्थानकांवरून सुरू असलेलं पलायन. काही कुटुंबं स्वातंत्र्यसोहळा पाहण्यासाठी दिल्लीमध्ये येत होती, तर काही स्वतःला हिंसेपासून वाचवण्यासाठी दिल्ली सोडून जात होती.
१३ ऑगस्टचा दिवस हा दोन टोकांचा दिवस होता एका बाजूला स्वप्नांच्या उंबरठ्यावर उभा असलेला भारत, आणि दुसऱ्या बाजूला अनिश्चिततेच्या धुक्यात हरवलेला भारत.