भक्तांच्या अंतःकरणातून हाक बाप्पा, पुढल्या वर्षी लवकर या

अनंत चतुर्दशी : बाप्पाला भावपूर्ण निरोप : येणं आनंदाचं, जाणं आशीर्वादाचं
सचिन मयेकर – छावा डिजिटल न्यूज पोर्टल ०६ सप्टेंबर २५
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांनंतर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गेल्या दहा दिवसांमध्ये रेवदंडा बाजारपेठेत गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याची सजावटीच्या वस्तू, फुले, नैवेद्य, पूजासाहित्य मोठी खरेदी झाली. याशिवाय फळभाज्यांसाठी देखील नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. गावातील बाजारपेठ भक्तांच्या गजबजाटाने भरून गेली होती.
आजच्या विसर्जन सोहळ्यात मात्र भक्तांच्या मनातली भावनिकता अधिक ठळकपणे जाणवली. ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत आणि “गणपती बाप्पा मोरया, पुन्हा वर्षी लवकर या!” या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले.
बाप्पाच्या आगमनात जसा आनंद, तसाच निरोपाच्या क्षणी आशीर्वादाचा अनुभव झाला.
येणं आनंदाचं… जाणं आशीर्वादाचं.
ही भावना प्रत्येक गणेशभक्ताच्या अंतःकरणात दाटून आली.
विसर्जनावेळी भक्तांच्या डोळ्यांत अश्रू होते, तर हृदयातून एकच प्रार्थना उमटत होती
शक्ती दे अन्यायाविरुद्ध लढण्याची, सामर्थ्य दे सत्याचा मार्ग धरून चालण्याची. काय चुकलं असेल तर क्षमा कर बाप्पा.
बाप्पाचा निरोप घेताना रेवदंडा गाव भावनांनी भारावून गेलं.
बाप्पा, पुन्हा वर्षी लवकर या… आमच्या घराघरात, आमच्या हृदयात.