ब्रेकिंग अपडेट | गोळा स्टॉपजवळ एसटी बसची धडक — बोर्ली गावातील वयोवृद्ध महिलेचा दुर्दैवी अंत

छावा दि.१८ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर)

रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोळा स्टॉपजवळ आज दुपारी एक दुर्दैवी अपघात घडला. बोर्ली गावातील मधला पाडा येथे राहणाऱ्या मथुरा वरसोलकर (वय अंदाजे ७० वर्षे) या वयोवृद्ध महिलेला एमएच-२० बीएल-३९३३ क्रमांकाच्या स्वारगेट–मुरूड मार्गावरील एस.टी. बसने जोरात धडक दिली.

प्राथमिक माहितीनुसार, धडकेनंतर त्यांच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने त्या घटनास्थळीच जागीच ठार झाल्या. या अपघातामुळे गावात व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तसेच संताप व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. किरवले, आणि त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, वाहनचालकाचा जबाब घेण्यात येत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या घटनेचा पुढील तपास रेवदंडा पोलीस करत आहेत.

ही घटना ताजी असली तरी, गावाच्या जखमा मात्र जुन्याच आहेत. कारण ह्याच गोळा स्टॉपजवळ धनशे कुटुंबातील एक कॉलेजला जाणारा तरुण काही वर्षांपूर्वी याच पद्धतीने एस.टी. बसखाली चिरडला गेला होता. तो बस चालकाचा ताबा सुटल्याने थेट पोलांवर आदळला आणि जागीच मृत्यू झाला होता.

 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *