बैल पोळा – शेतकऱ्याचा खरा सोहळा.

आज संपूर्ण महाराष्ट्रभर ढोल-ताशांचा गजर, गोंडस सजवलेल्या बैलांची आरास आणि शेतकऱ्याच्या डोळ्यातली चमक या सगळ्याचं कारण एकच… बैल पोळा.

सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल-२२ ऑगस्ट २५

श्रावण अमावस्येला साजरा होणारा हा सण म्हणजे शेतकऱ्याच्या घामाचा, श्रमाचा आणि त्याच्या खऱ्या साथीदार बैलाचा मानाचा उत्सव.

पहाटेपासूनच बैलांची निगा राखली जाते.

त्यांना साबणाने आंघोळ घालून सुगंधी तेलाने अंग चोळलं जातं. शिंगांना चमकदार रंगीत तेल लावलं जातं.

मानेत मोत्यांच्या व झेंडूच्या माळा, गळ्यात नाद घुमवणाऱ्या घंटा, तर अंगावर झगमगते कपडे आणि नक्षीदार फडकी…

आज गावोगावी बैलच बैल दिसत आहेत.

शेतकरी बायका त्यांच्या कपाळावर कुंकवाचे ठसे उमटवून आरती करतात आणि लहान मुलं त्या सजलेल्या बैलाभोवती आनंदाने खेळत फिरतात.

वर्षभर शेतामध्ये मशागत, नांगरणी, ओढणी, पेरणी, गाडं ओढणे अशी कठीण कामं करणाऱ्या या बैलांना आज विश्रांती दिली जाते.

त्यांना पुरणपोळी, भाकरी, पिठलं, तूरडाळ, गूळ-हरभरा असा खास मेवा दिला जातो.

आजच्या दिवशी शेतकरी काम विसरून फक्त आपल्या बैलाचा सन्मान करतो कारण त्याला ठाऊक आहे की, बैलाशिवाय शेतीची कल्पनाच नाही.

गावाच्या चौकात सजवलेल्या बैलांचे प्रदर्शन, बैलगाड्यांच्या शर्यती, ढोल-ताशांचा गजर, लेझीमच्या तालावर थिरकणारे तरुण, आणि गर्दीतून उठणारा जल्लोष…

आज प्रत्येक गाव उत्साहाने डोलत आहे.

हा दिवस मुलांसाठी आनंदाचा सोहळा तर शेतकऱ्यांसाठी खरी श्रमपूजेची संधी आहे.

बैल पोळा हा केवळ धार्मिक विधी नाही, तर तो कृतज्ञतेचा उत्सव आहे.

आपल्या आयुष्यात जे श्रम करतात, आपल्या सुखासाठी न थकता योगदान देतात  त्यांचा सन्मान करणे किती गरजेचे आहे याची आठवण हा सण करून देतो.

आजच्या यांत्रिकी युगात जरी ट्रॅक्टर, मशीन्स शेतात वापरली जात असली तरी बैलाचे स्थान गावकऱ्यांच्या हृदयात आजही अविचल आहे.

आज प्रत्येक शेतकरी आपल्या बैलाला नतमस्तक होत मनोमन म्हणतो

तू आहेस म्हणून मी शेतकरी आहे… तू आहेस म्हणून माझं शेत हिरवं आहे… तू आहेस म्हणून माझ्या घरात अन्न आहे.

आणि म्हणूनच बैल पोळा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान ठरतो.

👉 बैल पोळ्याचा हा आनंदोत्सव छाव्याच्या वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *