बेलकडे–कुरुळ ते आरसीएफ वसाहत मार्ग ठप्प! परीक्षा काळात विद्यार्थ्यांची धावपळ; नागरिकांचा संताप उसळला
- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍ सचिन मयेकर | रायगड
- 📅 सोमवार | १६ फेब्रुवारी २०२६
आज सकाळी बेलकडे–कुरुळ पासून RCF वसाहत पर्यंत संपूर्ण मार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली. बेलकडेहून अलिबागकडे येणारा रस्ता अक्षरशः ठप्प झाला. सकाळी ८ वाजता रेवदंडा व परिसरातून निघालेली अनेक वाहने ११ ते १२ वाजेपर्यंत गंतव्यस्थानी पोहोचू शकली नाहीत. वाहनांच्या लांबच लांब रांगा, हॉर्नांचा कर्णकर्कश आवाज आणि प्रचंड गोंधळ असे चित्र पाहायला मिळाले. सहाणगोठी ते सहाण बायपास, आरसीएफ कॉलनी, कुरुळ गेट ते कुरुळ वळण या भागांत रस्ता नूतनीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र रस्त्याचे खोदकाम, अर्धवट डांबरीकरण, काही ठिकाणी अरुंद झालेला मार्ग, डायव्हर्शन बोर्डांचा अभाव, आवश्यक त्या प्रमाणात ट्रॅफिक पोलिस नसणे या सर्व कारणांमुळे सकाळपासूनच वाहतूक विस्कळीत झाली. पर्यायी मार्गांची स्पष्ट माहिती नसल्याने सर्व वाहने एकाच ठिकाणी अडकली आणि परिस्थिती अधिक गंभीर बनली.
सध्या परीक्षा कालावधी सुरू असताना या ट्रॅफिकचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसला. वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचणे अत्यावश्यक असताना अनेक विद्यार्थी रस्त्यात अडकले. काहींना वाहन सोडून पायपीट करत केंद्र गाठावे लागले, तर काही उशिराने पोहोचले. पेपरपूर्वीच मानसिक ताण वाढल्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर परिणाम होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. “हे नुकसान भरून न निघणारे आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
शाळा बस, रुग्णवाहिका, सरकारी कर्मचारी आणि खासगी क्षेत्रातील कामगार सर्वच या कोंडीत अडकले. काहींना कार्यालयात उशीर झाला, तर काहींना आर्थिक नुकसान सहन करावे लागल्याची चर्चा आहे. आपत्कालीन सेवांनाही विलंबाचा फटका बसल्याचे सांगितले जाते.
रस्ता काम सुरू करण्यापूर्वी वाहतूक पोलिसांशी समन्वय, पर्यायी मार्ग आखणे आणि परीक्षा वेळेनुसार कामाचे वेळापत्रक बदलणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात नियोजनशून्यता स्पष्ट दिसून आली. परीक्षा काळात सकाळच्या वेळेत विशेष वाहतूक नियंत्रण, तात्पुरता मोकळा मार्ग उपलब्ध करणे, रस्त्याच्या कामाचे वेळापत्रक बदलणे, बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई विकासकामाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड का? बेलकडे–कुरुळ ते आरसीएफ वसाहत या पट्ट्यातील फुल्ल ट्रॅफिकमुळे प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तातडीने ठोस उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करावी, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे.
![]()

