बिबट्या अजून साखरेतच बिबट्याचा सिग्नल मिळूनही पकड अजून दूर शोधमोहीम तीव्र
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मयेकर —रेवदंडा, शनिवार — १३ डिसेंबर २०२५
नागाव–साखर परिसरात बिबट्याच्या धुमाकुळानंतर आता साखर कोळीवाडा भागात शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून काल रात्री तब्बल चार पिंजरे लावण्यात आले आहेत. पुण्याहून आलेली विशेष रेस्क्यू टीम सध्या घटनास्थळीच तैनात असून बिबट्याला पकडण्यासाठी अथक प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सलग पाच दिवसांपासून नागरिक भयभीत असताना आता शोधमोहीम पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र आहे.या संपूर्ण कारवाईचे नियोजन व नियंत्रण वनपरिक्षेत्र अधिकारी, अलिबाग नरेंद्र पाटील यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असून ते स्वतः संपूर्ण परिस्थिती हँडल करत आहेत, अशी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. काल रात्री बिबट्या परिसरात असल्याचा एक ठोस सिग्नल मिळाला होता, त्यामुळे शोधमोहीम अधिक आक्रमक करण्यात आली; मात्र सिग्नल मिळूनही बिबट्याला पकडण्यात अद्याप यश आलेले नाही, ही बाब त्यांनी स्पष्टपणे मान्य केली आहे.पुण्याच्या रेस्क्यू टीमसह स्थानिक वनकर्मचारी, पिंजरे, ट्रॅपिंग सिस्टीम आणि रात्रभर गस्त यांच्या माध्यमातून बिबट्याचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. साखर कोळीवाडा परिसरात सतर्कता वाढवण्यात आली असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नागावमध्ये आधी पाच जण, तर साखरमध्ये दोन जण जखमी झाल्यानंतरही बिबट्या मोकाट असल्याने नागरिकांमध्ये भीती कायम आहे. पिंजरे लावून, सिग्नल मिळूनही बिबट्या हाती लागत नसेल, तर हा एकच बिबट्या आहे की एकापेक्षा अधिक, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
दरम्यान, संपूर्ण नागाव–साखर परिसराचे लक्ष आता या शोधमोहीमेवर लागले असून आजची रात्र निर्णायक ठरणार का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
दरम्यान, अक्षी–साखर येथील राकेश गण यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, “बिबट्याने इतका धुमाकूळ घातलेला असताना आणि लोक जखमी होत असताना सुद्धा आधुनिक यंत्रणा असलेल्या शासनाला बिबट्या पकडता येत नाही, ही अत्यंत संतापजनक बाब आहे.” नागाव–साखर परिसरात सतत वाढत असलेल्या बिबट्याच्या वावरामुळे नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून जगत आहेत, प्रत्येक क्षणाला भीती मनात घेऊन दिवस काढावा लागत आहे, असेही त्यांनी नमूद केले.राकेश गण पुढे म्हणाले की, “या परिस्थितीचा सर्वात मोठा फटका मच्छीमार बांधवांना बसत आहे.” पहाटे आणि रात्री समुद्रावर जाणे धोक्याचे झाल्याने अनेक मच्छीमारांनी होड्या किनाऱ्यावरच रोखून ठेवल्या आहेत, परिणामी मच्छीमारी धंद्यावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. रोजच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांवर आता उपासमारीची वेळ येऊ लागली असून, बिबट्याच्या भीतीमुळे कामावर जाता येत नसल्याची वेदनादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.“शासन आणि वनविभागाने आता केवळ आवाहनांपुरते मर्यादित न राहता तातडीने ठोस कारवाई करावी, अन्यथा नागाव–साखर परिसरातील संताप आणखी तीव्र होईल,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
नागावमध्ये धुडगूस, साखरमध्ये रक्तरंजीत हल्ले! पाच दिवस उलटले तरी बिबट्या अद्याप मोकाट
गेल्या मंगळवारपासून नागाव–साखर परिसरात बिबट्याचा अक्षरशः धुडगूस सुरू असून आज शनिवार उजाडला तरीही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. सदर बिबट्या सर्वप्रथम नागाव गावात शिरला आणि तिथे अचानक हल्ले करत पाच जणांना जखमी केले, ज्यामुळे संपूर्ण नागाव गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले, शाळा बंद ठेवाव्या लागल्या आणि नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरू लागले. एवढ्या गंभीर घटनेनंतरही बिबट्या हाती लागला नाही आणि काही काळाने हा बिबट्या अचानक साखर गावाच्या दिशेने वळला, जिथे त्याने पुन्हा एकदा धुडगूस घालत सलग दोन जणांवर हल्ला केला आणि त्यांना गंभीररीत्या जखमी केले.नागावमध्ये पाच आणि साखरमध्ये दोन असे आतापर्यंत एकूण सात नागरिक बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत, तरीसुद्धा हा बिबट्या एक आहे की दोन, की त्याहून अधिक, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती वनविभाग, रेस्क्यू टीम किंवा प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. पाच दिवसांपासून शोधमोहीम सुरू असतानाही बिबट्याचा ठावठिकाणा लागलेला नाही, ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.या संपूर्ण काळात नागाव–साखर परिसरातील नागरिक अक्षरशः वाऱ्यावर असून लोक जीव मुठीत धरून दैनंदिन व्यवहार करत आहेत. सकाळी कामावर जाणे, संध्याकाळी परत येणे, रात्री घराबाहेर पडणे — प्रत्येक गोष्ट भीतीखाली होत आहे. नागाव परिसरातील शाळा अजूनही बंद ठेवण्यात आल्या असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवस शाळा बंद ठेवणे समजू शकते, पण पाच दिवस उलटूनही ठोस तोडगा न निघाल्याने पालकांमध्ये तीव्र चिंता आहे.याशिवाय नागाव हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा परिसर असल्याने या घटनेचा पर्यटन व्यवसायावरही मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. हॉटेल बुकिंग रद्द होत आहेत, पर्यटक येण्यास घाबरत आहेत आणि स्थानिक व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.सर्वात गंभीर बाब म्हणजे सात जखमी, शाळा बंद, पर्यटन ठप्प आणि नागरिक भयभीत असतानाही प्रशासनाकडून ठोस, विश्वास देणारी कृती दिसून येत नाही. त्यामुळे आता नागाव–साखर परिसरातील नागरिकांचा एकच सवाल आहे — पाच दिवस उलटून गेले तरी बिबट्या पकडला जात नसेल, तर याला जबाबदार कोण? आणि उद्या आणखी काही अनर्थ झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
![]()

