बळीराजासाठी आनंदवार्ता

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २० वा हप्ता २० जून रोजी होणार वितरित
ई-केवायसी, आधार सीडिंग प्रक्रियेची पूर्तता आवश्यक : जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
रत्नागिरी (वृत्तसंस्था, ५ जून) केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीतील २० वा हप्ता लाभार्थ्यांना २० जून २०२५ रोजी वितरित करण्यात येणार आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी, आधार सीडिंग व फॉर्मर आयडी नोंदणी तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत १,७२,४५७ लाभार्थी नोंदणीकृत असून, यापैकी ३८८० लाभार्थ्यांची ई-केवायसी व ७१६९ जणांची बँक खाते व आधार संलग्नता अद्याप प्रलंबित आहे. ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळू शकणार नाही.
या पार्श्वभूमीवर, प्रत्येक गावात ग्रामस्तरीय व्हिलेज नोडल अधिकारी (VNO), कृषी सहाय्यक तसेच सामाजिक सुविधा केंद्रे (CSC) यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.
दरम्यान, केंद्र शासनाच्या Agristack योजनेअंतर्गत फॉर्मर आयडी (Farmer ID) तयार करणे देखील आवश्यक आहे. जिल्ह्यातील १,२५,७४० लाभार्थ्यांनी फॉर्मर आयडी तयार केला असून, ४६,७१७ लाभार्थ्यांची नोंदणी प्रलंबित आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी https://mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी किंवा CSC केंद्र, कृषि विभाग, महसूल विभाग वा ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
शेतकऱ्यांनी २० जूनपूर्वी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून PM-KISAN योजनेचा लाभ वेळेवर मिळवावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २० वा हप्ता जून २०२५ मध्ये वितरित होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹६,००० ची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. २० वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे आणि आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी PM-KISAN च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. तसेच, आधार-बँक खाते संलग्नता सुनिश्चित करण्यासाठी आपल्या बँकेशी संपर्क साधावा. या प्रक्रियांची पूर्तता केल्यास, शेतकऱ्यांना हप्त्याची रक्कम वेळेवर प्राप्त होईल. अधिक माहितीसाठी आणि आपल्या स्थितीची तपासणी करण्यासाठी, कृपया pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.