फेसबुकवरील ओळखीचा धोकादायक शेवट; अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार

      चार महिन्यांची गर्भधारणा

     छावा दि.०७ जून  (सचिन मयेकर)

सोशल मीडियावर निर्माण झालेली ओळख एका अल्पवयीन मुलीला चांगलीच महागात पडली आहे. रायगड जिल्ह्यातील एका आदिवासी वस्तीतील चौदा वर्षांच्या मुलीवर १८ वर्षीय तरुणाने फसवून, लग्नाचे आमिष दाखवत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. सदर मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
गोरखनाथ गणेश पवार (वय १८, रा. चौकोशी ढाणवळे, ता. खालापूर) याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असून, न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुमारे आठ महिन्यांपूर्वी पीडित मुलीची फेसबुकवर गोरखनाथ पवार याच्याशी ओळख झाली होती. ही ओळख हळूहळू मैत्रीत आणि मग विश्वासात परिवर्तित झाली. यानंतर पवार याने लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या अत्याचारामुळे सदर मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाली आहे.
मुलीच्या कुटुंबियांनी खालापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर ८४/२०२५ नोंदवण्यात आला असून, आरोपीवर POCSO कायदा २०१२ अंतर्गत कलम ४ व ८ तसेच भादंवि ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेनंतर पालकांनी सोशल मीडियाच्या वापराबाबत आपल्या पाल्यांशी जागरूकपणे संवाद साधावा, मुलांच्या संगतीवर व वागणुकीवर लक्ष ठेवावे, अशी विनंती समाजातील विविध स्तरातून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *