फटाक्यांच्या आवाजाने घाबरून हरवलेला श्वान ‘चिकू’ सुखरूप…  मीटिंग सोडून धावले सरपंच… पिंपळभाटमध्ये घडली ‘चिकू’ची भावनिक पुनर्भेट!

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर रविवार ०१ मार्च २०२६

रेवदंडा येथील सरपंच प्रफुल्ल यशवंत मोरे यांच्या बहिण आराधना या अलिबाग येथे वास्तव्यास आहेत. फटाक्यांच्या कडकडाटामुळे त्यांचा लाडका पाळीव श्वान ‘चिकू’ घाबरून घराबाहेर पळाला आणि हरवला. अचानक गायब झालेल्या चिकूमुळे घरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. आराधना आणि कुटुंबीय त्याच्या विरहाने व्याकूळ झाले होते.

ही माहिती मिळताच अलिबाग येथे बैठकीत असलेले प्रफुल्ल मोरे बेचैन झाले. बहिणीचे दुःख पाहून त्यांनी मीटिंग अर्धवट सोडली आणि स्वतः शोधमोहीम हाती घेतली.

📍 पिंपळभाटमध्ये नियतीने घडवली भेट

अलिबाग जवळील पिंपळभाट परिसरात सुरुची हॉटेलच्या मागील बाजूस गाडी वळवताना त्यांना त्यांचा मित्र वारिक भेटला.

वारिक यांनी विचारले, “इकडे कसे?” त्यावर प्रफुल्ल मोरे म्हणाले, “आराधनाचा श्वान ‘चिकू’ हरवला आहे, त्याचा शोध घेतोय.”

त्यावर वारिक म्हणाले, “हो, सकाळी आराधनाचा फोन मला देखील आला होता. चिकू कालपासून गायब आहे.”

यानंतर त्यांनी प्रफुल्ल मोरे यांना आपल्या शेतघराकडे नेले.

शेतघर परिसरात काही गुजराती कर्मचारी कामानिमित्त वास्तव्यास होते. प्रफुल्ल मोरे आणि वारिक बोलत असतानाच अचानक आतून एक श्वान धावत बाहेर आला… आणि क्षणात सगळे थक्क झाले! तोच आराधनाचा हरवलेला ‘चिकू’ होता. प्रफुल्ल मोरे यांचा आनंद गगनात मावेना.

🤝 कर्मचाऱ्यांची माणुसकी ठरली वरदान

त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, अलिबागच्या प्रचंड ट्रॅफिकमध्ये त्यांना हा श्वान घाबरलेल्या अवस्थेत दिसला. मोठ्या प्रयत्नाने त्यांनी त्याला पकडले. “कुणाचातरी पाळीव श्वान असणार, मालक सापडेल,” या भावनेतून त्यांनी त्याला तात्काळ दवाखान्यात नेले, औषधोपचार केले, नवीन पट्टा घेतला आणि खाऊ-पाणी देत त्याची काळजी घेतली. विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी ते आपल्या गावी परत जाणार होते. जर त्या दिवशी प्रफुल्ल मोरे तिथे पोहोचले नसते, तर चिकू कायमचा दुरावला असता. मालकाच्या स्वाधीन करताना त्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.

फटाक्यांच्या आवाजाने घाबरून हरवलेला चिकू… आणि माणुसकीमुळे घडलेली ही भावनिक पुनर्भेट.. प्रफुल्ल मोरे आणि आराधना यांनी वारिक तसेच गुजराती कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले. योग्य वेळी घेतलेला निर्णय, मित्राची साथ आणि कर्मचाऱ्यांची माणुसकी 

यामुळेच घडला हा हृदयस्पर्शी चमत्कार!

जिथे बातमी फक्त घडत नाही… तर मनाला भिडते.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *