पेणमधील सावकारांना पोलिसांचा धडाका —

पोलीस अधीक्षक आचल दलाल यांची धडक कारवाई
जनतेच्या तक्रारीला प्रतिसाद, बेकायदेशीर सावकारीचा पर्दाफाश!
अलिबाग-प्रतिनिधी २० जुलै
पेण तालुक्यातील चिंचपाडा येथे बेकायदेशीररित्या सावकारीचा व्यवसाय चालवत नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या दोन सावकारांवर अखेर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एकाच वेळी छापे टाकून शेकडो वचनचिट्ट्या, धनादेश आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त केली असून, या प्रकरणामुळे संपूर्ण पेण परिसरात खळबळ उडाली आहे.
जनतेचा उद्रेक पोलीस अधीक्षकांपर्यंत
सुर्यकांत पाटील आणि भरत पाटील अशी या दोघा सावकारांची नावे असून, त्यांनी पेण परिसरात सावकारीचा परवानाधारक व्यवसाय चालवण्याच्या आडून अनेक कर्जदारांची अक्षरशः पिळवणूक केली होती. व्याजाच्या अमानवी दरांनी आणि धमक्यांच्या आधारे लोकांना अडचणीत आणले जात होते. अनेकांनी आपली जमीन, घर, दागिने गमावले होते.
या अन्यायाला कंटाळून काही पीडित नागरिकांनी थेट रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची भेट घेतली आणि तक्रारीसह आपली व्यथा मांडली. त्यांच्या लेखी तक्रारीची गंभीर दखल घेत, दलाल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
पोलिसांची संयुक्त कारवाई — अनेक ठिकाणी छापे
या आदेशानंतर पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक गठीत करण्यात आले. सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या पथकाने चिंचपाडा येथील संबंधित सावकारांच्या घर, हॉटेल आणि इतर व्यावसायिक ठिकाणांवर एकाच वेळी धाडसत्र राबवले.