पुणे बनले गुन्हेगारीचे माहेरघर! पुण्यात गोळीबार : गणेश कोमकरचा मुलगा आयुष उर्फ गोविंद कोमकर ठार

पुणे शहर पुन्हा एकदा रक्तरंजित टोळी संघर्षाने हादरले आहे. ५ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास नाना पेठ परिसरात झालेल्या धाडसी गोळीबारात आयुष उर्फ गोविंद कोमकर (२०) याचा जागीच मृत्यू झाला.

पुणे, ६ सप्टेंबर (PTI) २०२५

शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आयुष कोमकर ट्यूशनवरून घरी परतला होता. तो घराच्या बेसमेंटमधील पार्किंगमध्ये थांबलेला असतानाच दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. सलग तीन गोळ्या लागल्याने आयुष जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोर मात्र क्षणार्धात पसार झाले.

या घटनेमागे आंदेकर–कोमकर टोळी संघर्ष उघड होत आहे. गेल्या वर्षी म्हणजेच १ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची नाना पेठेतच निर्घृण हत्या झाली होती. त्या खटल्यात गणेश कोमकर आरोपी असून तो सध्या तुरुंगात आहे. आंदेकर गटाने सूड म्हणून ही कारवाई केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गुन्हे शाखेसह तब्बल सहा पथके तपासात गुंतली आहेत. घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज गोळा केले जात आहेत. पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले की ही हत्या पूर्ववैमनस्यातून घडली असून आरोपींना लवकरच पकडले जाईल.

दरम्यान, गणेशोत्सव विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या काळात घडलेल्या या घटनेने पुण्यात तणावाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे की पुणे हे खरंच गुन्हेगारीचं माहेरघर तर बनत नाही ना?

संपूर्ण पोलिस यंत्रणा बंदोबस्ताच्या कामात गुंतलेली असताना, हाच फायदा घेत मारेकऱ्यांनी हा कट रचल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *