पालखी सोहळ्यात थरकाप – बाजारपेठेतून स्विफ्टची बेफाम धाव; पोलिसांचा फिल्मी पाठलाग, चालकाचा काळा इतिहास उघड

दिनांक : १३ ऑगस्ट २०२५
छावा – सचिन मयेकर, रेवदंडा
रेवदंडा – दि. १३ ऑगस्ट २५ रोजी दुपारी साधारण 12.30 वाजता, श्री हनुमानाच्या पालखी मिरवणुकीदरम्यान आणि बाजारपेठ परिसरात एक थरकाप उडवणारा प्रकार घडला. मिरवणुकीत उपस्थित ग्रामस्थांच्या सुरक्षेची पर्वा न करता, पुणे आळंदी येथील प्रतीक बाळासाहेब भालेराव (रा. आळंदी, ता. खेड, जि. पुणे) या युवकाने आपल्या काळ्या फिल्म लावलेल्या स्विफ्ट कारमधून (क्रमांक MH-12-QY-2266) बेफाम वेगाने धाव घेतली. त्या वेळी त्याच्यासोबत त्याची मैत्रीण देखील होती.
हायस्कूलजवळ समुद्रकिनाऱ्याच्या रस्त्यावरून कार झेपावत असताना, त्या ठिकाणी श्री मारुतीरायाची पालखी पोहोचलेली होती. परिसरात विद्यार्थी देखील होते. क्षणभरात लोक बाजूला झाले आणि मोठी दुर्घटना टळली. मात्र पार नाक्यावरून मारुती अळीमध्ये कार शिरताच पालखीसाठी वादन करणारे ढोल-ताशा पथकातील तिघेजण गटारात पडले आणि त्यांना किरकोळ दुखापत झाली.
यानंतर कार हरेश्वर मंदिर, स्मशानभूमी मार्गे बंद्रराकडे निघाली आणि अगरकोट किल्ल्याजवळ किनाऱ्यावर थांबली. चालक व त्याची सहचालिका समुद्रकिनाऱ्याच्या चिखलातून पळू लागले, पण रेवदंडा पोलिस ठाण्याचे एएसआय एम. एन. खोत आणि पोलीस नाईक (क्रमांक 2290) एस. ए. गव्हाणे यांनी फिल्मी अंदाजात थरारक पाठलाग करून त्यांना चिखलातच ताब्यात घेतले.
काळा इतिहास उघड
पोलिस चौकशीत समोर आलं की, प्रतीक भालेराव याच्यावर यापूर्वीही वाहतूक नियमभंग केल्याबद्दल तब्बल ₹18,000 दंड बसलेला होता शिवाय आत मुलगी होती.. याच भीतीमुळे आणि पुन्हा फाईन टाळण्यासाठी आणि भांडे फुटेल या भीतीने त्याने गर्दीतील रस्त्यावरून वेगवान धाव घेत पळ काढला, ज्यामुळे भाविक आणि नागरिकांचा जीव धोक्यात आला.
पोलिसांनी ताबडतोब कार जप्त केली. वाहतूक शाखेमार्फत मोटार वाहन अधिनियम कलम 100(2), 179(1), 51/117, 239 नुसार कारवाई करून त्याच्याकडून ₹5,250 दंड वसूल करून शासन खात्यात जमा करण्यात आला.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, बाहेरून येणारे काही पर्यटक अशाच प्रकारे बेफिकीर किंवा धुंद अवस्थेत वाहने चालवत असतात, ज्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. अशा प्रकारांवर कठोर आणि तातडीने कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.
धाडसी पोलिसांची ‘फिल्मी’ कारवाई
गर्दीतून बेफाम वेगाने धावणाऱ्या गाडीमुळे क्षणात गोंधळ माजला असतानाच, एएसआय एम. एन. खोत आणि पोलीस नाईक एस. ए. गव्हाणे यांनी क्षणाचाही विलंब न करता थरारक पाठलाग सुरू केला. समुद्रकिनाऱ्याच्या चिखलातून पळणाऱ्या चालकाला पकडणं हे सोपं नव्हतं, पण दोन्ही पोलिसांनी जीवाची पर्वा न करता त्यांना गाठून ताब्यात घेतलं. त्यांच्या या धाडसामुळेच पुढील संभाव्य अपघात टळला आणि शेकडो भाविकांचा जीव वाचला. स्थानिक नागरिकांनी या शौर्यपूर्ण कृतीचे जोरदार कौतुक केले असून, अशा सतर्क आणि तत्पर पोलिसांमुळेच नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढतो, अशी भावना व्यक्त केली आहे.