पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून शहीद भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन
छावा • चंद्रपूर,दि. ९ जून | विशेष प्रतिनिधी
शहीद दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांच्या पावन स्मृतीस राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी अभिवादन करून त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, उपसंचालक आनंद रेड्डी, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, सामाजिक कार्यकर्ते सुभाष कासनगट्टूवार आदी मान्यवर उपस्थित होते
डॉ. अशोक उईके यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, “भगवान बिरसा मुंडा यांचा ९ जून हा बलिदान दिवस म्हणून पाळला जातो. त्यांचे योगदान केवळ आदिवासी समाजापुरते मर्यादित नसून, ते संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.”
ते पुढे म्हणाले की, “१५ नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांची जयंती ‘जनजाती गौरव दिन’ म्हणून देशभर साजरी केली जाते. हा संपूर्ण आदिवासी समाजाचा अभिमानाचा दिवस आहे. त्यांच्या विचारांनुसार आदिवासी समाजाने पुढे वाटचाल करावी, हेच खरे त्यांचे स्मरण ठरेल.”
कार्यक्रमात आदिवासी बांधव, विविध सामाजिक संघटना, शासकीय अधिकारी आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदानाची आठवण ठेवत समाजहितासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार या निमित्ताने करण्यात आला.