पांडुरंग पांडुरंग… गाथा बुडवली, पण विचार बुडले नाहीत : संत श्री तुकाराम महाराज

आज तिथी नाही, आज उत्सव नाही, पण आजही संत श्री तुकाराम महाराज आपल्याशी बोलत आहेत कारण संतांच्या विचारांना पंचांग लागत नाही आणि अभंगांना तारखेची गरज नसते. इंद्रायणीच्या काठावर उभा राहून ज्यांनी देवाला माणसात शोधायला शिकवलं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला धैर्य दिलं आणि भक्ती म्हणजे पळ काढणं नव्हे तर सत्यासाठी उभं राहणं आहे हे सांगितलं, त्या संत श्री तुकाराम महाराजांचे स्मरण करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट दिवशीची वाट पाहावी लागत नाही. त्यांनी सांगितलेला मार्ग हा कालातीत आहे. म्हणून आज हा लेख उत्सव म्हणून नाही, तर विचारांच्या उजेडासाठी, माणुसकीच्या शोधासाठी आणि अभंगांतून उमटणाऱ्या सत्याच्या आठवणीसाठी…

छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मयेकर — बुधवार —१७ डिसेंबर २०२५

इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेल्या देहू गावात अंदाजे इ.स. १६०८ साली जन्मलेले संत श्री तुकाराम महाराज केवळ एक संत नव्हते तर सामान्य माणसाच्या दुःखाला शब्द देणारा जिवंत विचार होते आणि त्यांच्या जन्माने महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेत एक नवा अध्याय सुरू झाला. संत श्री तुकाराम महाराजांचा जन्म कुंभार म्हणजेच प्रजापती समाजात झाला असून त्यांचे वडील बोल्होबा मोरे हे त्या काळातील संपन्न व्यापारी होते त्यामुळे बालपणात संत श्री तुकाराम महाराजांनी श्रीमंती, समाधान आणि सामाजिक प्रतिष्ठा जवळून पाहिली होती. मात्र आयुष्याने अचानक वळण घेतले आणि वडिलांचे अकाली निधन, दुष्काळ, व्यापारातील तोटा आणि कर्ज यामुळे घरातील समृद्धी ओसरली तसेच पहिल्या पत्नीचे दुःखद निधन झाल्याने संत श्री तुकाराम महाराजांच्या अंतःकरणात जीवनाच्या अस्थिरतेची खोल जाणीव निर्माण झाली. संसाराच्या जबाबदाऱ्या असूनही संत श्री तुकाराम महाराजांचे मन हळूहळू विठ्ठलाकडे झुकू लागले आणि देवाचा शोध मंदिरात नव्हे तर माणसाच्या वेदनेत घ्यायला त्यांनी सुरुवात केली. पुढे जिजाबाई यांच्याशी विवाह होऊन संसार पुन्हा उभा राहिला तरी संत श्री तुकाराम महाराजांचा अंतर्मन सतत देवाशी संवाद साधत राहिला आणि याच संवादातून अभंग जन्माला आले. संत श्री तुकाराम महाराजांनी कोणतेही अवघड शास्त्र किंवा विद्वत्तेचा आव न आणता सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या मराठीत अभंग रचले आणि या अभंगांतून त्यांनी पाखंड, अन्याय आणि दांभिकपणावर निर्भीडपणे घाव घातला त्यामुळे हे शब्द शेतकऱ्याच्या ओठांवर, कष्टकऱ्याच्या मनात आणि उपेक्षितांच्या काळजात घर करू लागले. सतराव्या शतकाच्या मध्यकाळात अंदाजे इ.स. १६४० ते १६४५ या काळात संत श्री तुकाराम महाराजांचा प्रभाव वाढू लागला आणि हा संत समाजात वरचढ ठरतो आहे या भीतीतून काही शिकलेले लोक आणि पारंपरिक विचारांना घट्ट धरून बसलेले घटक अस्वस्थ झाले. या अस्वस्थतेतून संत श्री तुकाराम महाराजांवर सातत्याने दबाव टाकण्यात आला, टोमणे मारण्यात आले आणि कटकारस्थानांच्या माध्यमातून अखेरीस संत श्री तुकाराम महाराजांनाच स्वतःची अभंगगाथा इंद्रायणी नदीत बुडवायला भाग पाडण्यात आले. त्या कठीण क्षणी संत श्री तुकाराम महाराजांनी कोणताही विरोध केला नाही किंवा कुणावरही दोष ठेवला नाही तर शांतपणे हे सर्व स्वीकारले आणि इंद्रायणीच्या काठावर बसून विठ्ठलाचे अखंड नामस्मरण सुरू केले. तब्बल तेरा दिवस संत श्री तुकाराम महाराज उपाशीपोटी नदीकाठी बसून राहिले आणि या काळात गाथा प्रत्यक्ष पाण्यातून वर आली नाही पण या तेरा दिवसांत समाजाच्या मनात मोठा बदल घडत गेला कारण लोकांच्या तोंडून अभंग अधिक जोमाने वाहू लागले, गावोगाव संत श्री तुकाराम महाराजांचे शब्द पसरू लागले आणि ज्यांनी त्यांना कमी लेखले होते त्यांच्याच मुखातून हे अभंग नकळत बाहेर पडू लागले. गाथा पाण्यावर तरंगून वर आली नाही पण ती लोकांच्या मुखातून, लोकांच्या विचारांतून आणि समाजाच्या अंतःकरणातून तरंगत वर आली आणि हाच तो क्षण होता जेव्हा विरोध करणाऱ्यांना उमगले की गाथा बुडवायला लावता येते पण विचार कधीच बुडवता येत नाहीत. या घटनेनंतर संत श्री तुकाराम महाराजांचा प्रभाव अधिक वाढत गेला आणि त्यांचे अभंग केवळ भक्तीपुरते मर्यादित न राहता सामाजिक जागृतीचे साधन बनले. पुढे मार्गशीर्ष कृष्ण द्वितीयेच्या दिवशी संत श्री तुकाराम महाराजांनी देह ठेवला आणि वैकुंठगमन केले अशी भक्तांची श्रद्धा आहे परंतु प्रत्यक्षात संत श्री तुकाराम महाराज देहाने गेले तरी विचारांनी आजही जिवंत आहेत कारण त्यांच्या अभंगांत आजही शेतकऱ्याचा श्वास, कष्टकऱ्याचा घाम आणि उपेक्षितांचा आक्रोश ऐकू येतो. संत श्री तुकाराम महाराज म्हणजे भक्तीच्या नावाखाली पलायन न करता अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शिकवण देणारा संत असून देवाला देव्हाऱ्यातून बाहेर काढून माणसाच्या हृदयात बसवणारा विचार आहे आणि म्हणूनच देहूच्या वाऱ्यात, इंद्रायणीच्या प्रवाहात आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये आजही संत श्री तुकाराम महाराज अखंड बोलत आहेत.

 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *