पनवेल एसटी स्थानकावर प्रवाशांचा उद्रेक; बस टंचाईमुळे प्रचंड गोंधळ
- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍️ पनवेल प्रतिनिधी
- 📅 शनिवार , ७ फेब्रुवारी २६
काल दि. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत पनवेल एसटी स्थानक येथे अभूतपूर्व गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून आले. निवडणूक कामासाठी मोठ्या प्रमाणावर एसटी बसेस रवाना करण्यात आल्याने पनवेल आगारात बसेस तसेच चालक-वाहकांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला होता.
दररोजप्रमाणे पेण, अलिबाग व रोहा दिशेला जाण्यासाठी संध्याकाळी चाकरमानी, विद्यार्थी व लघु व्यावसायिकांची मोठी गर्दी असते. मात्र काल पनवेलहून सुटणाऱ्या या मार्गांवरील गाड्या जवळपास उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मुंबई व ठाणे येथून येणाऱ्या आधीच भरून आलेल्या बसेसवर अवलंबून राहावे लागले. परिणामी मर्यादित बसेस व प्रचंड गर्दीमुळे स्थानकातील परिस्थिती हाताबाहेर गेली.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची एक जीप स्थानकात तैनात होती. सायंकाळी सव्वासातच्या सुमारास रोह्याहून आलेली एसटी (क्रमांक MH14 KQ 3970) स्थानकाच्या उत्तरेकडे आली असता पेण व रोहा दिशेच्या प्रवाशांनी दरवाज्याकडे धाव घेतली. मात्र वाहकाने फलाटावर बस लावेपर्यंत कोणालाही चढू न देण्याची आडमुठी भूमिका घेत दरवाजा बंदच ठेवला. पुढे पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रवाशांना फलाटावर जाण्यास सांगितले.
त्यानंतर बस फलाटावर नेताना देखील दरवाज्याजवळ एकाचवेळी प्रवासी जमा झाल्याने वाहकाने पुन्हा उद्दाम वर्तन केले व चालकाला गाडी भरधाव वेगाने गोल फिरवण्यास सांगितले. या कृतीमुळे संभाव्य अपघाताचा धोका निर्माण झाला. सुदैवाने प्रवाशांकडून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, मात्र या गैरवर्तनामुळे प्रवाशांचा संताप उफाळून आला.
या घटनेची सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच अलिबाग, पेण व रोहा दिशेच्या काही गाड्या पनवेलऐवजी मुंबई व वाशी येथून सोडण्यात आल्यास पनवेल स्थानकावरील ताण कमी होईल, अशी आग्रही मागणी प्रवाशांनी प्रशासनाकडे केली आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
![]()

