निवडणूक निकालानंतर चौल–तुलाडदेवी परिसरात तणाव; रेवदंडा पोलिसांत परस्पर तक्रारी
- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍अलिबाग प्रतिनिधी
- 📅 बुधवार,११ फेब्रुवारी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर चौल–तुलाडदेवी परिसरात राजकीय तणाव निर्माण होऊन हाणामारी, वाहनाची तोडफोड, शिवीगाळ तसेच महिलेस अपमानास्पद वर्तन झाल्याच्या आरोपांवरून रेवदंडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेची दखल उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांनी घेतली असून, दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे.
याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्याकडून प्राप्त माहितीनुसार,
पहिला गुन्हा (गु.र.नं. १९/२०२६)
या प्रकरणी राजलक्ष्मी गिरीश खामीतकर (वय ३८, रा. नागाव चिच बंदर, ता. अलिबाग) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता त्या नातेवाईकांसह फॉर्च्युनर (क्र. MH 06 CL 6318) या वाहनातून दर्शनासाठी जात असताना तुलाडदेवी मंदिराजवळील शिवसेना (उबाठा) गटाच्या कार्यालयासमोर काही कार्यकर्त्यांनी वाहन अडवून शिवीगाळ व दमदाटी केली.
तसेच वाहनावर हाताने फटके मारून व लोखंडी रॉडने मागील काच फोडून नुकसान केल्याचा आरोप आहे. या घटनेदरम्यान वाहनातील एका महिलेस अपमानास्पद वर्तन करून अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोपही फिर्यादीत नमूद आहे. याच वेळी परिसरात उपस्थित काही व्यक्तींना लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा उल्लेख आहे.
या प्रकरणी पोलिस नोंदीनुसार संस्कार म्हात्रे, सुरेंद्र म्हात्रे, साहील राउत, मारुती भगत, अजित गुरव, अजित मिसाळ, शैलेश घरत, आर्यन मिसाळ, प्रतिक नाईक, अजित मगर, अजिंक्य मिसाळ, रुपाली सुरेंद्र म्हात्रे, गणेश म्हात्रे, विजय भोसले, विषाल विजय भोसले, मयंक मारुती भगत, सोहम धनेष नाईक यांच्यासह इतर अनोळखी व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरा गुन्हा (गु.र.नं. २०/२०२६)
दरम्यान, सुरेंद्र मोरेश्वर म्हात्रे (वय ५८, व्यवसाय – बांधकाम, रा. चौल–तुलाडदेवी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांसह चर्चा करीत असताना विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीदरम्यान कार्यालयासमोर फटाके लावण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी तो प्रकार हटकवल्यानंतर त्यातून वाद निर्माण झाला.त्यानंतर बेकायदेशीर जमाव जमवून कार्यालयाच्या आवारात घुसून लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेत काही जणांना दुखापत झाली असून, एका महिलेस ओढून तिच्या सन्मानास धक्का पोहोचविल्याचा आरोप फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणी पोलिस नोंदीनुसार अंकित गुरव, अमोल घरत, सिध्देश शेणवईकर, निखील राउत, महेंद्र घरत, अमित राउत, विध्देश माळी व प्रतिक माळी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![]()

