“निवडणूक आयोगाची प्रक्रिया पारदर्शक व उत्तरदायित्वपूर्ण”
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचा खरमरीत प्रत्युत्तर
छावा | मुंबई, दि. १० | विशेष प्रतिनिधी |
भारत निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला २४ डिसेंबर २०२४ रोजी सविस्तर आणि अधिकृत उत्तर दिले असून, त्यांच्या निवेदनात मांडण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांवर तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, या पत्रव्यवहारानंतरही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांद्वारे पुन्हा शंका उपस्थित केल्यामुळे आयोगाने याबाबत खेद व्यक्त केला आहे.
आयोगाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, “निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र आणि संविधानिक संस्था आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा त्याच्या नेत्याने थेट पत्राद्वारे संपर्क साधल्यास आम्ही नेहमी उत्तर दिले आहे आणि देत राहू.”
राहुल गांधी यांनी आयोगाशी थेट संपर्क साधण्याऐवजी माध्यमांमधून आरोप मांडल्याचे ‘आश्चर्यकारक आणि खेदजनक’ असल्याचे मत आयोगाने व्यक्त केले. त्यांनी प्रश्न थेट पत्राद्वारे मांडल्यास त्यांना योग्य आणि औपचारिक उत्तर देणे आयोगास शक्य झाले असते, असेही यावेळी सांगण्यात आले.
लोकशाही प्रक्रियेचा सन्मान राखण्याचे आवाहन
“निवडणूक आयोगाकडे विचारलेल्या अधिकृत प्रश्नांना उत्तर देण्याची आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे,” असे आयोगाने ठामपणे नमूद केले.
या प्रकारचा संवाद माध्यमांतून नव्हे तर थेट आयोगाशी साधल्यास, लोकशाही प्रक्रियेला बळ मिळेल आणि संवाद अधिक प्रभावी ठरेल, असेही आयोगाने स्पष्ट केले.