नाताळ–नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बनावट मद्य वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – पनवेल, प्रतिनिधी — मंगळवार १६ डिसेंबर २०२५
नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर बनावट मद्याच्या वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कडक कारवाई केली आहे. पनवेल ग्रामीण विभागाच्या उत्पादन शुल्क निरीक्षकांनी केलेल्या या कारवाईत पडघे येथील जयवंत दत्तू भोईर (वय ३८) याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रविवार (दि. १४) रोजी तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोटगाव रोडवरील शिवम अपार्टमेंट, सेक्टर १६, तळोजा येथे उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचला होता. या कारवाईदरम्यान एका चारचाकी वाहनातून बनावट विदेशी मद्याच्या १४४ बाटल्या आणि संबंधित वाहन असा एकूण २ लाख ५८ हजार १२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपी जयवंत भोईर याच्याकडे चौकशी केली असता सदरचे मद्य जवळच असलेल्या एका फ्लॅटमधून आणल्याची माहिती त्याने दिली. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने त्या फ्लॅटवर छापा टाकून विविध ब्रँडच्या बनावट विदेशी मद्याच्या २५० बाटल्या जप्त केल्या. या ठिकाणाहून ८० हजार २७० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.दोन्ही ठिकाणी मिळून एकूण ३ लाख ३८ हजार ३९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी जयवंत भोईर याला अटक करण्यात आली आहे.ही कारवाई पनवेल ग्रामीण विभागाचे दुय्यम निरीक्षक अनिल बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली अजित बडदे, सुरेश झगडे, गैनीनाथ पालवे, सचिन कदम आणि ऋषिकेश भोगे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
![]()

