पालव हिरानंदानी परिसरात खळबळ, बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याचा दावा

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
✍️ सचिन मयेकर
📅 मंगळवार , २३ डिसेंबर २५

नागाव, पालव, आक्षी आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावराने नागरिकांच्या मनात भीती घर करून बसली असतानाच आज दुपारी घडलेल्या एका घटनेने या भीतीला आणखी धार दिली आहे. पालव गावाच्या आधी असलेल्या त्या मार्गावर, जिथून डायनॅमिक कंपनीमार्गे साताड बंदरकडे जाता येते, तिथे वाडीतील सुपारी पाडण्यासाठी एक कामगार घरत सायकलवरून जात असताना त्याला बिबट्यासदृश्य प्राणी दोन पिल्ल्यांसह दिसून आल्याचा दावा करण्यात आला. हे दृश्य अचानक समोर येताच तो प्रचंड घाबरला, त्याने तात्काळ आपली सायकल मागे वळवली आणि कोणताही धोका नको म्हणून त्या मार्गाने पुढे न जाता दुसऱ्या रस्त्याने वळसा घालून साताड बंदर गाठले. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या या घटनेमुळे तो पूर्णपणे भयभीत अवस्थेत होता.
यानंतर तो नागाव येथे पोहोचला असता त्याची घाबरलेली अवस्था पाहून वाडीच्या मालकाने त्याला कारण विचारले. तेव्हा कामगाराने आपण पालव हिरानंदानी येथील प्लॉटजवळ असलेल्या पडीक बंगल्याच्या परिसरात बिबट्यासदृश्य प्राणी दोन पिल्ल्यांसह पाहिल्याचा दावा केला. ही माहिती शेजाऱ्यांपर्यंत पोहोचताच काही वेळातच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तातडीने डॉ. सचिन राऊळ यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच गांभीर्य ओळखून डॉ. राऊळ यांनी थेट अलिबागकडे धाव घेत वनविभागाशी संपर्क साधला आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह पुन्हा घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या सोबत नागाव येथील ग्रामस्थ गणेश पाटील, विशाल पाटील, लाभेश नाईक, सुनील पाटील आणि मंदार नाईक हेही उपस्थित होते.
वनविभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांनी संयुक्तपणे घटनास्थळी पाहणी सुरू केली. सुरुवातीला परिसर कोरडा व खडकाळ असल्याने प्रथमदर्शनी कोणत्याही प्रकारचे प्राण्यांचे ठसे आढळून आले नाहीत. त्यामुळे सर्वजण जवळपास परत निघण्याच्या तयारीत असतानाच, थोड्या अंतरावर वेगळ्या प्रकारचे आणि ठळक पंजांचे ठसे दिसून आले. हे ठसे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दाखवण्यात आले असता, त्यांनी स्पष्ट केले की हे पंजे कुत्र्याचे नक्कीच नाहीत. तसेच या परिसरात तरस या वन्यप्राण्याचा वास किंवा वावर असण्याची शक्यता असून, हे पंजे तरसचे असू शकतात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. याबाबत सचिन राऊळ आणि उपस्थित ग्रामस्थांनी ‘छावा’शी बोलताना ही माहिती दिली.
या ठशांमुळे पालव–नागाव परिसरातील भीती आणखी वाढली असून, आधीच नागाव आणि आसपासच्या भागात सुरू असलेल्या बिबट्याच्या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. काही दिवसांपासून विविध ठिकाणी बिबट्याच्या वावराबाबत चर्चा, अफवा आणि संशयाचे वातावरण असतानाच, आजच्या घटनेमुळे नागरिक अधिकच अस्वस्थ झाले आहेत. प्रत्यक्षात बिबट्या आहे की बिबट्यासदृश्य दुसरा कोणता वन्यप्राणी याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही.
या पार्श्वभूमीवर पालव, नागाव आणि लगतच्या परिसरात वनविभागाकडून गस्त वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी एकटे बाहेर जाणे टाळावे, रात्री विशेष काळजी घ्यावी, लहान मुलांना बाहेर सोडू नये आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभाग किंवा स्थानिक प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ठोस निष्कर्ष जाहीर होईपर्यंत नागाव–पालव–आक्षी परिसरातील नागरिक जीव मुठीत धरूनच दैनंदिन जीवन जगत आहेत, हे वास्तव या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *