नवरात्रोत्सव —पहिला दिवस शैलपुत्रीच्या चरणी भक्तीची आराधना
आजपासून नऊ दिवसांचा पवित्र नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. पहिला दिवस शैलपुत्री देवीला समर्पित असतो. पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून ओळखली जाणारी शैलपुत्री ही शौर्य, स्थैर्य आणि भक्तीची मूर्ती आहे. या दिवशी देवीच्या साध्या, पण अर्थपूर्ण आराधनेमुळे घरात सुख-समृद्धी व शांती नांदत.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा सोमवार, २२ सप्टेंबर २०२५
पुराणकथेनुसार, महिषासुर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते की त्याला कोणताही पुरुष किंवा देव मारू शकणार नाही. या वरदानाच्या गर्वात त्याने स्वर्गावर आक्रमण करून देवांना पराभूत केले आणि संपूर्ण जगावर अत्याचार सुरू केले.देवतांच्या यातना पाहून त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्यासह सर्व देवतांनी आपली शक्ती एकवटली. त्या तेजातून प्रकट झाली आदिशक्ती देवी दुर्गा.तिनं नऊ दिवस व रात्री महिषासुराशी भीषण युद्ध केलं आणि अखेर दहाव्या दिवशी त्याचा वध केला.या विजयाच्या स्मरणार्थ नवरात्र साजरे केले जाते. हे पर्व म्हणजे सत्याचा असत्यावर, धर्माचा अधर्मावर विजय.
शैलपुत्री देवीची पूजा
पहिला दिवस शैलपुत्री देवीच्या आराधनेला समर्पित केला जातो.सकाळी किंवा संध्याकाळी घर स्वच्छ करून दिवा लावावा.देवीसमोर फुले, अगरबत्ती आणि प्रसाद अर्पण करावा.छोटी प्रार्थना करून कुटुंबासाठी सुख, शांती आणि समृद्धीची कामना करावी.
प्रार्थना :
“ॐ देवी शैलपुत्र्यै नमः ।
हे जगजननी, शौर्य व स्थैर्याची मूर्ती,
आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो.
तुमच्या चरणी आमची भक्ती अर्पण करतो.
जय माता दी..
नवरात्र हा केवळ धार्मिक विधींचा सण नाही, तर सामाजिक एकतेचंही प्रतीक आहे.गावागावात गरबा-डांडिया, तर शहरांमध्ये मंदिरातील आरत्या सर्वत्र भक्तीभावाचा उत्साह दिसून येतो.शैलपुत्रीच्या दिवशी नातेवाईक भेटणे, घरात स्वच्छता ठेवणे आणि नवीन आरंभासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे याला विशेष महत्त्व आहे.शैलपुत्रीच्या चरणी अर्पण केलेली छोटीशी प्रार्थना देखील घरात शांतता व सकारात्मकता निर्माण करते. या नवरात्रात प्रत्येकाच्या जीवनात धैर्य, स्थैर्य आणि नवी ऊर्जा लाभो हाच छावा परिवाराचा आशीर्वाद.नवरात्राच्या प्रत्येक दिवशी देवीचे वेगवेगळे रूप पूजले जाते. उद्या जाणून घेऊया दुसऱ्या दिवशीच्या ब्रह्मचारिणी देवीचे महत्त्व.
![]()

