छावा — सत्याचा आवाज, अफवांना फाटा.धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज! चाहत्यांना दिलासा मिळाला
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठी आजची सकाळ दिलासा देणारी ठरली आहे. तब्येतीच्या अडचणींमुळे मागील ३१ ऑक्टोबरपासून मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या धर्मेंद्र यांना अखेर आज सकाळी साडेसातच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला आहे.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल — सचिन मयेकर—मुंबई — बुधवार – १२ नोव्हेंबर २०२५
धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओल स्वतः रुग्णवाहिकेतून वडिलांना घरी घेऊन गेला, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आता त्यांच्यावर घरातच डॉक्टरांच्या देखरेखीखाली पुढील उपचार सुरू राहतील.
धर्मेंद्र यांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका टप्प्यावर त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या बातम्यांमुळे चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती.
काल अचानक सोशल मीडियावर त्यांच्या निधनाच्या बातम्या व्हायरल झाल्या, मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी आणि डॉक्टरांनी त्या अफवा असल्याचे स्पष्ट केले. सनी देओल आणि बॉबी देओल यांच्या टीमनेही चाहत्यांना शांत राहण्याचे आणि चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
हेमा मालिनी आणि ईशा देओल यांनीदेखील सोशल मीडियावरून धर्मेंद्र यांची तब्येत सुधारत असल्याचे सांगितले आहे.
👉 ‘छावा’चे खंबीर मत:
अफवा नाही, सत्य वाचा! धर्मेंद्र आता घरी आहेत, प्रकृती सुधारते आहे. चाहत्यांच्या शुभेच्छांनी पुन्हा एकदा “ही-मॅन” उठून उभा राहत आहे.
छावा — सत्याचा आवाज, अफवांना फाटा.
![]()

