धर्मवीरांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पुन्हा दुमदुमणार! किल्ले पुरंदर ते श्रीक्षेत्र तुळापूर–वढू बुद्रुक भव्य पायी पालखी सोहळा

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर १४ मार्च २०२६

तुळापूरची ती माती आजही हुंदके देत आहे… इंद्रायणी आणि भीमेचे पाणी त्या दिवशी रक्ताने लाल झाले होते…सह्याद्रीचा कडाही त्या काळरात्री मूकपणे रडला होता…

स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले पुरंदर ते श्रीक्षेत्र तुळापूर–वढू बुद्रुक असा भव्य पायी पालखी सोहळा १५ ते १८ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

सासवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत सोहळ्याचे अध्यक्ष सचिन पलांडे यांनी ही माहिती दिली. सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित या सोहळ्याच्या नियोजनाची बैठक वनपुरी (ता. पुरंदर) येथे पार पडली.

यावेळी सोहळ्याचे अध्यक्ष सचिन पलांडे, सरचिटणीस भाऊसाहेब शिंदे, संचालक सागर काळे, अमित पवार, प्रशांत वांढेकर, सदानंद बोरकर, शिवतेज काळे, विश्वास जगताप, योगेश तावडे तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य हरिभाऊ लोळे, डॉ. प्राजक्ता दुर्गाडे आणि पंचायत समिती सदस्या अर्चना कटके उपस्थित होते.

गेल्या १२ वर्षांपासून अविरत सुरू असलेला हा पालखी सोहळा धर्मवीर संभाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले पुरंदर ते समाधिस्थळ श्रीक्षेत्र तुळापूर–वढू बुद्रुक असा आयोजित केला जातो.

यंदाचा सोहळा १५ मार्च रोजी सकाळी ९ वाजता श्रीक्षेत्र नारायणपूर येथील दत्त मंदिरातून प्रस्थान ठेवणार आहे.

पालखी सोहळा सासवड येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात दुपारी १२ ते ४ या वेळेत विसाव्यासाठी थांबणार आहे. त्यानंतर सायंकाळी काळेवाडी येथील श्रीराम मंदिरात मुक्काम होणार असून येथे गुरुवर्य संदीपराज महिंद गुरुजी यांचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान होणार आहे.

सोमवारी (दि.१६) सकाळी ८.३० वाजता पालखी सोहळा काळेवाडी येथून दिवे घाटमार्गे वडकी आणि देवाची उरुळी येथे विसाव्यानंतर लोणी काळभोर येथे मुक्काम करणार आहे.

मंगळवारी (दि.१७) पालखी सोहळा थेऊर आणि कोलवडीमार्गे लोणीकंद येथे मुक्कामासाठी पोहोचणार आहे.

तर १८ मार्च रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र तुळापूर–वढू बुद्रुक येथे पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे.

धर्मवीर संभाजी महाराजांच्या पराक्रम आणि बलिदानाची स्मृती जागवणारा हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार असून शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *