त्रिपुरारी पौर्णिमा : अधर्मावर धर्माचा दीपोत्सव! देवांची दिवाळी आज उत्साहात; शंकराने त्रिपुरासुराचा संहार करून उजळला विश्व
आज कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा आणि देव दिवाळी या दिवशी संपूर्ण देशभरात मंदिरे, घाट, किल्ले आणि देवस्थाने दिव्यांच्या तेजाने उजळून निघाली आहेत. आजचा दिवस धर्माचा विजय, शिवशक्तीचा उदय आणि श्रद्धेचा दीपोत्सव म्हणून साजरा केला जातो.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल — सचिन मयेकर — बुधवार –०५ नोव्हेंबर २०२५
पुराणातील दिव्य कथा
त्रिपुरासुर हा तीन भव्य नगरे एक पृथ्वीवर, एक आकाशात आणि एक पाताळात अशा त्रिपुर नावाच्या राज्यावर राज्य करत होता. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानामुळे त्याला कोणाच्याही हातून मृत्यू नव्हता. त्याच्या अत्याचाराने देवता, मानव आणि ऋषी त्रस्त झाले.तेव्हा सर्व देवांनी भगवान महादेव शंकराच्या चरणी शरणागती पत्करली.भगवान शंकराने पर्वत रथ केला, विष्णू सारथी झाले, आणि ब्रह्मदेव धनुर्धारी.योग्य क्षणी, एका बाणाने भगवान शंकराने त्या त्रिपुरासुराच्या तीन नगरांचा संहार केला आणि त्या क्षणी विश्व प्रकाशमय झाले तोच क्षण म्हणजे अधर्मावर धर्माचा विजय!देवांनी आनंदाने दिवे लावले म्हणून आजची ही रात्र देव दिवाळी म्हणून साजरी केली जाते.
भक्ती, श्रद्धा आणि प्रकाशाचा उत्सव
आजच्या दिवशी शंकर मंदिरांमध्ये रुद्राभिषेक, दीपदान आणि गंगास्नान याचे विशेष आयोजन केले जाते. रेवदंडा, अलिबाग, आणि रायगड परिसरातील अनेक मंदिरांमध्ये आज दिव्यांची आरास, शंकर आरती आणि हर हर महादेवच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले आहे.त्रिपुरारी पौर्णिमेचे तात्त्विक महत्त्व असे सांगितले जाते की त्रिपुर म्हणजे आपल्या मनातील तीन दोष राग, लोभ आणि अहंकार.भगवान शंकराचा बाण म्हणजे आत्मजागर!”
या दिवशी लावलेला प्रत्येक दीप हा केवळ पूजा नसतो — तो आपल्या अंतःकरणातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न असतो.रात्री नदीकाठी, गडावर किंवा घराच्या अंगणात लावलेले दिवे सांगतात
जिथे श्रद्धा पेटते, तिथे देव प्रकटतो…..
![]()

