तुरुंगातून बाहेर आले मुंबईचे “डॅडी” अरुण गवळी.

१७ वर्षांचा तुरुंगवास संपून सुप्रीम कोर्टाने दिला दिलासा
मुंबईच्या अंडरवर्ल्डपासून ते विधानसभेच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाव – अरुण गवळी. कधी डॉन, तर कधी “डॅडी” म्हणून ओळखले जाणारे गवळी आता जवळपास १७ वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. सुप्रीम कोर्टाने ३ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली.
सचिन मयेकर,‘छावा’ मुंबई ४ सप्टेंबर २०२५
१९८०–९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डमध्ये गवळी गटाचा दबदबा निर्माण झाला.
दगडी चाळ हा त्यांचा गड म्हणून ओळखला जायचा.
अनेक हत्याकांड, वर्चस्वासाठीचे संघर्ष, पोलिसांशी धुमश्चक्री यामुळं गवळींनी मुंबई डॉन अशी प्रतिमा कमावली.
मात्र काळाच्या ओघात त्यांनी राजकारणाकडे वळत अखिल भारतीय सेना पक्ष स्थापन केला.
२००४ मध्ये बायजुला मतदारसंघातून आमदारपदी निवडून येत त्यांनी राजकारणात थेट एंट्री घेतली.
२ मार्च २००७ रोजी मुंबईच्या गोरेगावमध्ये शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा धागा गवळी गटाशी जोडला आणि अरुण गवळींना अटक करण्यात आली.
२९ ऑगस्ट २०१२ – मुंबईतील MCOCA न्यायालयाने अरुण गवळींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
त्यानंतर त्यांना नागपूर मध्यवर्ती तुरुंगात हलवण्यात आले.
जवळपास १७ वर्षे त्यांनी तुरुंगात काढली.
या काळात त्यांनी अनेकदा जामीनासाठी अर्ज केले, परंतु सुप्रीम कोर्टाने प्रत्येक वेळी नकार दिला.
३ सप्टेंबर २०२५ रोजी सुप्रीम कोर्टाने गवळींना जामीन मंजूर केला.
त्यांची नागपूर तुरुंगातून नाट्यमय सुटका झाली.
तुरुंगाबाहेर आल्यावर त्यांनी सांगितले
मला partial justice मिळालं आहे. उरलेलं न्यायालय ठरवेल. आता मला कुटुंबासमवेत वेळ घालवायचा आहे.
मात्र इथेच कहाणी संपत नाही. कारण या खटल्याची पुढील सुनावणी फेब्रुवारी २०२६ मध्ये सुप्रीम कोर्टात होणार आहे.
अरुण गवळी आता पुन्हा राजकारणात सक्रिय होतील का?
मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील “डॅडी” पुन्हा आपला गड मजबूत करतील का?
किंवा ते खरोखरच “फॅमिली फर्स्ट” या घोषणेप्रमाणे राजकारणापासून दूर राहून कुटुंबासोबत साधं आयुष्य जगतील?
हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. पण एक गोष्ट नक्की अरुण गवळी बाहेर आल्याने मुंबईच्या राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
१७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर “डॅडी” अरुण गवळी पुन्हा मोकळ्या हवेत श्वास घेत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे, पण न्यायालयीन लढा अजून शिल्लक आहे.
मुंबईतील डॅडीची ही नवी इनिंग नेमकी कोणत्या दिशेने जाईल, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.