डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त रेवदंड्यात भव्य स्वच्छता अभियान
२०.३ टन कचरा हटवला अंतर्गत गल्या, गाव, समुद्रकीनारा चकाचक
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर रविवार ०१ मार्च २०२६
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा तर्फे ग्रामपंचायत हद्दीत भव्य, नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. पद्मश्री दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वच्छता उपक्रम पार पडला.
जयंतीदिनी समाजजागृतीचा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवत गावातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच अंतर्गत आळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली. स्वयंसेवकांनी नियोजनबद्ध पद्धतीने वेगवेगळ्या भागांत पथके तयार करून मोहीम राबवली.
अभियानादरम्यान तब्बल २०.३ टन कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. प्लास्टिक, साचलेली घाण, रस्त्याकडील कचरा तसेच नाल्यांमधील अडथळे दूर करून परिसर स्वच्छ, मोकळा व आरोग्यदायी करण्यात आला. काही ठिकाणी झुडपे कापून रस्ते व गल्ल्या खुल्या करण्यात आल्या.
या उपक्रमात एकूण १०९७ सदस्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने श्रमदान केले. स्थानिक ग्रामस्थांनीही सक्रिय सहभाग नोंदवत अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्यामुळे संपूर्ण गावात स्वच्छतेचा सकारात्मक संदेश पोहोचला.
कचरा व अस्वच्छतेमुळे निर्माण होणारी दुर्गंधी, रोगराई आणि डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा अत्यंत आवश्यक ठरतात. सार्वजनिक आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न किती प्रभावी ठरतात, याचे हे अभियान उत्तम उदाहरण ठरले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी समाजजागृती, शिस्त आणि विवेकाचा संदेश दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले हे स्वच्छता अभियान म्हणजे त्या विचारांना कृतीतून दिलेले अभिवादन ठरले. रेवदंडा गाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी राहावे तसेच प्रत्येक नागरिकामध्ये स्वच्छतेविषयी जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहें.

![]()

