झापूक-झूपूक” वीजपुरवठा रेवदंड्यात वीजेचा लपंडाव; नागरिक हैराण

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, रेवदंडा बुधवार ०५ मार्च २०२६

झापूक-झूपूक…

आघोळीला जायचं तर झापूक-झूपूक!

जेवायला बसायचं तर झापूक-झूपूक!

रात्री झोपायला जायचं तर झापूक-झूपूक!

कामाला बसायचं तर झापूक-झूपूक!

पंख्याखाली बसायचं तर झापूक-झूपूक!

रेवदंडा परिसरात सध्या वीजपुरवठ्याची अशीच अवस्था झाली असून गेले काही दिवस वीजेचा अक्षरशः लपंडाव सुरू आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.

वीजपुरवठा सतत जात-येत असल्यामुळे घरगुती कामांमध्ये अडथळे निर्माण होत असून दुकाने तसेच छोट्या व्यवसायांवरही त्याचा परिणाम होत आहे. अचानक ये-जा करणाऱ्या वीजेमुळे टीव्ही, फ्रीज, पंखे तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे नादुरुस्त होण्याची भीती ग्राहकांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

दरम्यान, उन्हाळ्याची चाहूल लागल्याने उकाडा वाढू लागला आहे. दिवसभराच्या उष्णतेने हैराण झालेले नागरिक थोडावेळ पंख्याखाली बसून दिलासा मिळेल असा विचार करत असतानाच वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे.

या संदर्भात महावितरणकडून स्पष्टीकरण देताना सध्या जोराचा वारा सुटल्यामुळे वीजवाहिन्यांमध्ये ट्रिपिंग होत असून त्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे, असे सांगण्यात आले आहे.

मात्र, वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *